म्युझिक स्ट्रीमिंग सर्व्हिस (Music Streaming Service) स्पॉटिफाईने म्हटले आहे की ती तिच्या कर्मचार्यांपैकी 6 टक्के कर्मचारी कपात करत आहे. आर्थिक उलाढाल कमी होत असल्याचे कारण देत कर्मचारी कपात करणारी Google, Amazon, Microsoft नंतर Spotify ही आणखी एक टेक कंपनी समोर आली आहे. कंपनीचे सीईओ डॅनियल एक (Daniel Ek) यांनी एका ऑनलाइन पोस्टद्वारे कर्मचार्यांना ही माहिती दिली.
कंपनीचा वाढता खर्च आटोक्यात आणण्यासाठी, आम्ही आमच्या कर्मचार्यांची संख्या कमी करण्याचा कठीण पण आवश्यक निर्णय घेतला आहे, असे डॅनियल यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे. Amazon, Microsoft आणि Google सारख्या बड्या टेक कंपन्यांनी याच महिन्यात हजारो कर्मचारी कपातीचे धोरण स्वीकारले आणि तशी घोषणा देखील केली. कामगार कपातीचे कारण देताना कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान उद्योगाची आर्थिक भरभराट अपेक्षित तेवढी झाली नाही असे म्हटले आहे. अपेक्षित महसूलाच्या प्रमाणात खर्च अधिक होत असल्याचे कारण कंपनीने दिले आहे.
डॅनियल म्हणाले की स्टॉकहोममध्ये मुख्यालय असलेले स्पॉटिफाय ही इतरांपेक्षा वेगळी कंपनी नाही. या कंपनीला देखील आर्थिक प्रश्नांबाबत काही निर्णय घ्यावे लागत आहेत. कोरोना संसर्गानंतर आम्ही आमचा ब्रँड आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत टिकवून ठेवू अशी आम्हांला आशा होती. जागतिक मंदी आणि जाहिरातींचा कमी झालेला प्रवाह आमच्यासाठी अडचण बनली आहे, असे डॅनियल म्हणाले.
डॅनियल यांनी निवेदनात हे देखील सांगितले की, कंपनी जगभरात आपल्या सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यांपैकी सुमारे 6 टक्के कर्मचारी कपात करत आहे. कर्मचारी कपातीची त्यांनी विशिष्ट अशी आकडेवारी दिली नाही. परंतु Spotify ने आपल्या ताज्या वार्षिक अहवालात सांगितले की त्यांच्याकडे सुमारे 6,600 कर्मचारी काम करतात. ज्याचा अर्थ असा आहे की कंपनीने 400 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.
जागतिक बाजारपेठेत आम्हांला चांगली संधी मिळेल असा आम्हाला आशावाद होता, परंतु तसे घडले नाही. कर्मचाऱ्यांना ज्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे त्याची मी संपूर्ण जबाबदारी घेतो आहे असेही डॅनियल म्हणाले.