स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) विशेष एफडी स्कीम एसबीआय वीकेअर (SBI WeCare) या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आता या योजनेत 30 सप्टेंबर 2023पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. एसबी आय वीकेअर फिक्स्ड डिपॉझिटचा किमान मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. जास्तीत जास्त 10 वर्षांसाठी यात गुंतवणूक करता येवू शकते. एसबीआय या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior citizens) उच्च असा व्याजदर देत आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसनं हा आढावा घेतला आहे.
Table of contents [Show]
परतावा कसा?
एसबीआय वीकेअर या मुदत ठेव योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 50 बीपीएस म्हणजेच कार्ड दरावर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देण्यात येत आहे. बँक सध्या एसबीआय वीकेअर मुदत ठेव योजनेवर 7.50 टक्के व्याजाचा दर देत आहे. सामान्य एफडीपेक्षा तो जास्त आहे. 5 वर्षे तसंच 10 वर्षे या दोन्ही कालावधीसाठी 7.50 टक्के व्याज या योजनेद्वारे मिळतं. नियमित मुदत ठेवींवरचा व्याज दर हा 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 3.50 टक्के ते 7.10 टक्क्यांच्या दरम्यान असणार आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिक पॉइन्ट्स आणि त्यावर व्याज मिळतं.
फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच?
एसबीआयनं कोविड 19दरम्यान ही योजना सुरू केली. या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि उच्च परतावा देणारा पर्याय मिळावा म्हणून एसबीआय वीकेअर एफडी योजना सुरू केली. या योजनेत 30 सप्टेंबर 2023पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. ही योजना नव्या ठेवींसाठी आणि मॅच्युअर ठेवींच्या नूतनीकरणासाठीदेखील उपलब्ध असणार आहेत. दरम्यान, यासारख्या आणखी कोणत्या योजना आहेत? पाहू...
एसबीआय अमृत कलश (SBI Amrit Kalash)
स्टेट बँक ऑफ इंडियानं 7.10 टक्के व्याज दरासह 400 दिवसांची विशेष मुदतीची योजना म्हणजेच विशेष ठेव योजना सुरू केली आहे. अमृत कलश असं या योजनेचं नाव आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के इतका उत्कृष्ट परतावा दिला जातो. ही योजना 30 जून 2023 रोजी संपणार आहे.
एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडी (HDFC Bank Senior Citizen Care FD
एचडीएफसी बँकेनं मे 2020मध्ये ज्येष्ठ नागरिक केअर एफडी नावाची नवीन मुदत ठेव यजना लॉन्च केली. या विशेष एफडी योजनेंतर्गत, बँक 5 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 0.25 टक्के अतिरिक्त व्याजदर देऊ करते. बँक पाच वर्षे ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 7.75 टक्के व्याजदर देत आहे. ही योजना 7 जुलै 2023 रोजी संपणार आहे.
इंडियन बँक स्पेशल एफडी आयएनडी शक्ती (Indian Bank Special FD IND Shakti)
इंडियन बँक स्पेशल एफडी आयएनडी शक्ती ही 555 दिवसांची मुदत ठेव योजना आहे. या योजनेअंतर्गत बँक सर्वसामान्यांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याज ऑफर करते. 400 दिवसांच्या कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना बँक 8 टक्के इतकं व्याज देते. या प्लॅनमध्ये किमान गुंतवणूक 10,000 रुपये आहे आणि कॉल करण्यायोग्य पर्यायांसह 400 दिवसांसाठी कमाल गुंतवणूक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. ही योजना 30 जून 2023 रोजी संपत आहे.