देशात बेरोजगारीची मोठी समस्या आपण सगळेच अनुभवतो आहोत. जागतिक मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद होताना दिसते आहे. मोठमोठ्या आयटी कंपन्या एका रात्रीतून कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. अशा परिस्थितीत बेरोजगार युवकांना बेरोजगारी भत्ता देण्याचा निर्णय एका राज्याने घेतला आहे.
काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? पण ही बातमी खरी आहे. छत्तीसगड सरकारने बेरोजगार तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. जे तरुण सुशिक्षित आहेत आणि नोकरीधंद्यासाठी वेगवगेळ्या ठिकाणी आवेदन देत आहेत अशा तरुणांना हा भत्ता दिला जाणार आहे. हा भत्ता दरमहा दिला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
खरे तर 26 जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी, श्री. भूपेश बघेल यांनी या योजनेची घोषणा केली होती. त्यांनतर सरकारी पातळीवर त्याबाबत बैठका झाल्या आणि त्यावर विस्तृत असा आराखडा बनवला गेला. त्यानुसार बेरोजगारांना दरमहा भत्ता देण्यात येणार आहे.
1 एप्रिलपासून सुरु होणार योजना
ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्याच कुटुंबातील बेरोजगारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून दरमहा अडीच हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे. भत्त्यासोबतच बेरोजगार युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याची देखील योजना सरकारने आखली आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा भत्ता जमा होणार आहे.संपूर्ण छत्तीसगड राज्यात ही योजना लागू केली जाणार आहे.
Chhattisgarh | Farmer has become prosperous in the state. We have also launched the portal for unemployment allowance which will be implemented by April 1. We have opened new medical colleges and schools in the state. We have passed the 'Patrakaar Suraksha' law: CM Bhupesh Baghel… pic.twitter.com/xxhSyPjijY
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) March 25, 2023
योजनेसाठी पात्रता काय?
बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी अर्जदार हा छत्तीसगड राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना केवळ छत्तीसगडमधील रहिवाशांसाठी आहे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.वायची कमाल मर्यादा 35 वर्षे इतकी ठरवण्यात आली आहे.
अर्जदाराने किमान उच्च माध्यमिक म्हणजे मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच, अर्जदाराने छत्तीसगडच्या कोणत्याही जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.
डिसेंबर 2022 मध्ये देशातील बेरोजगारी दर हा 8.30% इतका नोंदवला गेला होता. गेल्या 16 महिन्यांतील ही सर्वात मोठी बेरोजगारीची आकडेवारी असल्याचे सीएमआयई (Centre for Monitoring Indian Economy) या संस्थेने म्हटले होते.
महाराष्ट्र सरकारची देखील आहे योजना!
2020 मध्ये महाराष्ट्र सरकारने देखील बेरोजगारांना भत्ता देण्याची योजना सुरु केली आहे. याअंतर्गत पात्र उमेदवारांना महिना 5000 रुपयांची आर्थिक मदत करण्याची तरतूद आहे. 12 वी उत्तीर्ण ते पदवीधर तरुण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या 21 ते 35 वर्षे वयोगटातील तरुण या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.