खासगी अवकाश तंत्रज्ञान क्षेत्र भारतामध्ये बाल्यवस्थेत असून मोजक्या स्टार्टअप्स या क्षेत्रात काम करत आहेत. या कंपन्यांनी अवकाशात आपले स्वत:चे उपग्रह सोडले आहेत. येत्या काळात खासगी स्पेस तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते. आगामी बजेटकडून स्पेस तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना सरकारी मदतीची अपेक्षा आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह आणि करातून सुटका मिळावी, अशी अपेक्षा या कंपन्यांनी व्यक्त केली आहे.
स्पेस तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये नवनवीन कंपन्या उतरत आहेत. मात्र, त्यांना लागणारे उपकरणे, सुटे भाग परदेशातून आयात करावे लागतात. स्थानिक बाजारात हे उपकरणे मिळावे यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. १०० कोटींचा सरकारी निधी कंपन्यांच्या विकासासाठी मिळावा अशी अपेक्षा या क्षेत्रातील कंपन्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात भारताची या क्षेत्रात क्षमता विकसित व्हायला हवी, अशी अपेक्षा स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रातील खासगी कंपन्यांची आहे.
भारतीय स्पेस स्टार्टअप्स
पिक्सेल (Pixxel) ही बंगळुरुतील स्टार्टअप कंपनी स्पेस टेक्नॉलॉजी क्षेत्रात कार्यरत आहे. मागील वर्षी कंपनीने छायाचित्रणासाठी स्वत:चा 'शकुंतला' नावाचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. ही किमया करणारी पिक्सेल ही भारतातील पहिली कंपनी आहे. त्यानंतर आनंद हा सुद्धा उपग्रह कंपनीने इस्रोच्या PSLV यानाने अवकाशात धाडला. पृथ्वी निरीक्षणासाठी आणखी एक उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी पिक्सेल कंपनी प्रयत्नशील आहे. 2023-24 बजेटमध्ये पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सरकारकडून 100 कोटी व्हायाबल गॅप फंडीग (GAP) मिळावी ही अपेक्षा कंपनीला आहे.
ध्रुवस्पेस ही हैदराबाद येथील स्टार्टअप कंपनी देखील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये कार्यरत असून दोन उपग्रह अवकाशात सोडले आहेत. भविष्यात उपग्रह निर्मिती युनिट सुरू करण्यासाठी कंपनी नियोजन आखत आहे. डिफेन्स स्पेस एजन्सी सुरू करण्यासाठी सरकारने 1 हजार कोटींची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा ध्रुवस्पेस कंपनीची आहे. याद्वारे कंपन्यांना उपकरणांचा पुरवठा केला जाईल.