मध्यमवर्गाचे वाढते उत्पन्न आणि कार घेण्याकडे वाढता कल यामुळे वाहन उद्योगासाठी वर्ष 2022 तेजीचे गेले आहे. छोट्या कार्सची विक्री पाच वर्षांतील उच्चांकी स्तर गाठण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यात 994000 हॅचबॅक कार्सची विक्री झाली आहे. छोट्या कार विक्रीचा हाच वेग कायम राहिला तर मार्च 2023 अखेर भारतात एकूण 1370000 कार्सची विक्री होण्याची शक्यता आहे. मागील पाच वर्षांतील ही सर्वाधिक विक्री असेल.
मध्यमवर्ग आणि उच्च मध्यम वर्गाला त्यांच्या बजेटनुसार कारची मॉडेल्स उपलब्ध करण्यामध्ये ऑटो कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स या सारख्या कंपन्या छोट्या कार्स विक्री करण्यात आघाडीवर आहेत. मारुती सुझुकीची अल्टो के10 आणि टाटा टियागो ईव्ही मोटारच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.
गेल्या आर्थिक वर्षात देशभरात 1150000 छोट्या कारची विक्री झाली होती. त्याआधीच्या वर्षात 2020-21 मध्ये 1055000 कारची विक्री झाली होती. यंदा यापेक्षा अधिक कार्सची विक्री होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर 2022 या नऊ महिन्यात 994000 हॅचबॅक कार्सची विक्री झाली आहे. छोट्या कारची विक्रीत मोठी वाढ अपेक्षित आहे.
मारुती सुझुकीची सर्वात लोकप्रिय कार असलेल्या अल्टोच्या विक्रीत यंदा मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागात अल्टोला प्रचंड मागणी आहे. नोव्हेंबरपर्यंतच्या तीन महिन्यात कंपनीने 61767 अल्टो मोटारींची ग्रामीण भागात विक्री केली होती. भारतात वर्ष 2022 मध्ये जवळपास 38 लाख मोटारींची विक्री झाली आहे. भारत वाहन विक्रीच्या बाबतीत तिसरी मोठी बाजारपेठ बनली आहे. भारताने जपानला मागे टाकले. गेल्या वर्षभरात ऑटो कंपन्यांनी तब्बल 50 लाख मोटरींचे उत्पादन केले होते.
या कार ठरल्या लोकप्रिय
हॅचबॅक प्रकारात वॅगनआर, बलेनो, अल्टो या कारला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. त्याशिवाय चालू वर्षातील पहिल्या नऊ महिन्यात टाटा नेक्सन ही कार सर्वाधिक विक्री झालेली ही कार ठरली आहे. वाहनांची किंमत, सहज उपलब्ध होणारे कर्ज यामुळे छोट्या कारला ग्राहक पसंती देत आहे. पहिल्यांदा कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे सरासरी वय 35 किंवा त्याहून कमी आहे.