आजही बहुसंख्य लोक गाव खेड्यांमध्ये राहत आहेत. शेतीसोबत छोटे-मोठे व्यवसाय करून गावांमध्ये आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. या व्यावसायिकांमध्ये किराणामाल दुकानदार, शिंपी, चांभार, कुंभार, स्टेशनरी व्यावसायिक, बेकरी आणि इस्त्रीवाला यासारख्या अनेकांचा समावेश होतो. अशा छोट्या व्यवसायिकांचे उत्पन्न हे त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असते. मासिक उत्पन्न निश्चित नसल्याने आर्थिक गुंतवणूक कशी करायची? कुठे गुंतवणूक केल्यावर सर्वाधिक परतावा मिळवू शकतो? याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
एसआयपी (SIP)
सध्या गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र बहुसंख्य लोक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये (SIP) गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अंतर्गत असून यामध्ये परतावा मिळेलच असे नाही.किमान 500 रुपयांपासून म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये गुंतवणूक करता येते.
एसआयपीचा गुंतवणूक कालावधी जितका जास्त त्यातून मिळणारा परतावाही तितकाच जास्त असतो. त्यामुळे गावाकडील छोटे व्यावसायिक म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये 500 रुपयांची गुंतवणूक करून मोठा फंड तयार करू शकतात. मासिक 500 रुपये एसआयपीमध्ये गुंतवणे छोट्या व्यावसायिकांसाठी शक्य आहे. ही एसआयपी किती वर्षासाठी करायची, हे ते स्वतः ठरवू शकतात.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
भारत सरकारकडून चालवण्यात आलेली 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना' म्हणजेच पीपीएफमध्ये (PPF) छोटे व्यावसायिक गुंतवणूक करू शकतात. ही योजना 1968 सालापासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना 7.1% व्याजदर वार्षिक आधारावर देण्यात येत आहे. या योजनेत किमान 500 रुपये, तर कमाल 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. ही गुंतवणूक 15 वर्षासाठी केली जाते. 15 वर्षानंतर यातील परतावा मिळवता येतो. कोणत्याही बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिसमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते (PPF) ओपन करता येते.
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना (Post Office Recurring Deposit Scheme)
पोस्टमार्फत वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. छोट्या व्यावसायिकांसाठी पोस्टातील 'आवर्ती ठेव योजना' (Recurring Deposit Scheme) हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. सध्या केंद्र सरकारने या योजनेतील व्याजदरात 0.30 टक्क्यांची वाढ केली आहे. या व्याजदरवाढीनंतर सध्या या योजनेत 6.5% व्याजदर दिले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा गुंतवणूक कालावधी 1,2,3 आणि 5 वर्षाचा आहे. मॅच्युरिटीनंतर यातील रकमेचा वापर छोटे व्यावसायिक व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टींसाठी करू शकतात.