Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Payment Refund: ऑनलाइन पेमेंट फसले तर पैसे परत मिळतील का? बँक कधी परतावा देते आणि कधी नाही? जाणून घ्या नियम

Online Payment Refund

Online Payment Refund: तुमचे ऑनलाइन पेमेंट कधी फेल होते तर कधी चुकीच्या खात्यात जाते. अशा वेळी बँक तुमचे पैसे परत देण्यास बांधील आहे का? बँक नेमक्या कोणत्या परिस्थितीत परतावा देते आणि कधी हात झटकते, याचे सविस्तर नियम वाचा.

ऑनलाइन व्यवहारांच्या जगात पेमेंट फसणे किंवा फसवणूक होणे ही आता मोठी चिंता बनली आहे. जेव्हा एखादे पेमेंट चुकते, तेव्हा पैसे परत मिळतील अशी आपली पहिली अपेक्षा असते. कधी हे पैसे आपोआप परत येतात, तर कधी बँकेसोबत मोठी ओढाताण करावी लागते. हे सर्व कशावर अवलंबून असते? तुमचे पैसे परत मिळतील की नाही, हे प्रामुख्याने व्यवहाराच्या स्वरूपावर आणि त्यात तुमच्या भूमिकेवर अवलंबून असते.

१. बँक पैसे कधी परत देते?

काही बाबतीत नियम अगदी स्पष्ट आहेत आणि तिथे ग्राहकाचे हित जपले जाते:

टेक्निकल एरर: जर तुमच्या खात्यातून पैसे कापले गेले पण व्यवहार 'फेल' किंवा 'पेंडिंग' झाला, तर बँकांना ठराविक वेळेत ते पैसे परत करावे लागतात. बहुतेक वेळा हे पैसे काही तास किंवा 2 ते 3 दिवसांत आपोआप परत येतात.

अनधिकृत व्यवहार: जर तुमच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे गेले (उदा. कार्ड क्लोनिंग किंवा हॅकिंग), तर तुम्ही सुरक्षित असता. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, असा व्यवहार झाल्यापासून 3 कार्यालयीन दिवसांच्या आत बँकेला कळवल्यास तुमची जबाबदारी शून्य किंवा मर्यादित असते.

२. बँक परतावा देण्यास कधी नकार देऊ शकते?

हा सर्वात मोठा 'धोकादायक' भाग आहे, जिथे ग्राहकांची अनेकदा फसगत होते:

स्वतःहून केलेला व्यवहार: जर तुम्ही फसवणुकीला बळी पडलात आणि स्वतःहून पिन (PIN) किंवा ओटीपी (OTP) शेअर केला, तर बँक ते पैसे परत देण्यास नकार देऊ शकते. बँकेच्या मते, तो व्यवहार तुम्ही स्वतः प्रमाणित केला आहे.

उशिरा दिलेली माहिती: जर अनधिकृत व्यवहार होऊन अनेक दिवस उलटले आणि तुम्ही बँकेला कळवले नाही, तर तुमची बाजू कमकुवत होते. उशीर झाल्यामुळे नुकसान वाढले असे मानून बँक परतावा नाकारू शकते.

३. तक्रार कुठे आणि कशी करावी?

मर्चंट वाद: जर तुम्ही एखाद्या वस्तूला पैसे दिले पण ती मिळाली नाही, तर आधी त्या दुकानदाराकडे (Merchant) दाद मागावी लागते. बँक यात थेट हस्तक्षेप करण्याऐवजी 'चार्ज बॅक' प्रक्रियेचा वापर करू शकते.

UPI आणि कार्ड व्यवहार: कार्ड व्यवहारांमध्ये परताव्याची प्रक्रिया अधिक सुटसुटीत आहे. UPI बाबत तक्रार निवारण यंत्रणा सुधारत असली, तरी चुकीच्या व्यक्तीला पाठवलेले पैसे परत मिळवणे कठीण असते.

महत्त्वाची खबरदारी:

कोणताही व्यवहार करण्यापूर्वी तपशील तपासा. अनधिकृत व्यवहाराची माहिती किमान 24 तासांच्या आत बँकेला द्या. तुमचा पिन किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नका, कारण एकदा तुम्ही व्यवहार 'Approve' केला की परताव्याची शक्यता कमी होते.