पॅन कार्ड (PAN) म्हणजे केवळ प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी लागणारे कागदपत्र, हा समज आता जुना झाला आहे. आजच्या काळात तुम्ही एखादी वस्तू खरेदी करत असाल किंवा गुंतवणूक, तुमच्या पॅन कार्डचा क्रमांक तिथे असणे अनिवार्य आहे. सरकारने काही ठराविक आर्थिक मर्यादा ओलांडणाऱ्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड बंधनकारक केले आहे.
'या' 17 व्यवहारांसाठी पॅन कार्ड द्यावेच लागेल:
मालमत्ता खरेदी-विक्री: जर तुम्ही 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे घर किंवा जमीन खरेदी-विक्री करत असाल.
बँक डिपॉझिट: बँकेत एकाच दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करण्यासाठी.
मुदत ठेव (FD): बँकेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची एफडी करताना किंवा वर्षभरात 5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास.
शेअर खरेदी-विक्री: शेअर बाजारात सूचिबद्ध नसलेल्या कंपन्यांचे 1 लाख रुपयांहून अधिक शेअर्स खरेदी करताना.
म्युच्युअल फंड: 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेची गुंतवणूक करताना.
परदेश प्रवास: परदेशी चलन खरेदी किंवा परदेश प्रवासासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम खर्च केल्यास.
वाहनांची खरेदी-विक्री: दुचाकी सोडून इतर कोणत्याही चारचाकी वाहनाचा व्यवहार करताना.
बँक खाते उघडणे: कोणत्याही बँकेत किंवा सहकारी बँकेत नवीन बचत खाते उघडण्यासाठी.
क्रेडिट आणि डेबिट कार्ड: नवीन कार्डासाठी अर्ज करताना पॅन कार्ड क्रमांक देणे गरजेचे आहे.
लाईफ इन्शुरन्स: विमा कंपनीला वर्षभरात 50,000 रुपयांपेक्षा जास्त प्रीमियम भरताना.
डीमॅट खाते: शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी लागणारे डीमॅट खाते उघडताना.
हॉटेल बिल पेमेंट: हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये 50,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे रोख पेमेंट केल्यास.
बँक ड्राफ्ट/चेक: पे-ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढण्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख दिल्यास.
डिबेंचर्स आणि बॉन्ड्स: कोणत्याही कंपनीचे बाँड्स खरेदी करताना 50,000 रुपयांहून अधिक व्यवहार केल्यास.
डिजिटल वॉलेट: ई-वॉलेट किंवा प्रीपेड कार्डमध्ये वर्षाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करण्यासाठी.
सिक्युरिटीज खरेदी: शेअर्सव्यतिरिक्त इतर सिक्युरिटीजच्या 1 लाख रुपयांच्या वरील खरेदी-विक्रीसाठी.
इतर मोठ्या सेवा: वरील यादीत नसलेल्या कोणत्याही वस्तू किंवा सेवेसाठी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पेमेंट करताना.
एप्रिल 2026 पासून नवे नियम लागू
1 एप्रिल 2026 पासून पॅन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल झाला आहे. आता केवळ आधार कार्डच्या आधारे पॅन कार्ड मिळणार नाही. अर्जदाराला आता जन्मतारखेचा (Date of Birth) स्वतंत्र पुरावा जोडणे अनिवार्य असेल. यासाठी जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा 10 वीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल.
याशिवाय, विदेशी संस्था आणि नागरिकांसाठी सरकारने नवीन फॉर्म 95 आणि 96 सादर केले आहेत. तुम्ही कोणतेही मोठे आर्थिक पाऊल उचलण्यापूर्वी पॅन कार्डशी संबंधित या अटी तपासून घेणे हिताचे ठरेल.