• 04 Oct, 2022 15:23

Silver ETF: गुंतवणूकदारांची पसंती, आतापर्यंत 1400 कोटींची गुंतवणूक

Silver ETF

Silver ETF : भौतिक सोने आणि चांदीच्या तुलनेत, म्युच्युअल फंडाची रचना अधिक सुविधा, परवडणारी आणि तरलता देते. अलिकडच्या काळात म्युच्युअल फंडांनी लॉंच केलेल्या सिल्व्हर ईटीएफ योजनांना गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद दिला आहे.

शेअर मार्केट रेग्युलेटर सेबीने चांदीला मालमत्ता वर्गाचा (Asset Class) दर्जा दिल्यानंतर म्युच्युअल फंडांनी चांदीत गुंतवणूक संधी देणाऱ्या ईटीएफ योजना बाजारात आणल्या आहेत. आतापर्यंत 'Silver ETF' ला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सहा महिन्यांत या योजनांमध्ये 1400 कोटींची गुंतवणूक झाली आहे. (Silver ETF Collect 1400 Crore till 31st July 2022)

ताज्या आकडेवारीनुसार सध्या तीन फंड कंपन्यांचे 'Silver ETF' गुंतवणुकीसाठी खुले आहेत. आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय प्रुडेंशिअल म्युच्युअल फंड आणि निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड यांनी 'Silver ETF' सुरु आहेत. त्याशिवाय याच कंपन्यांचे फंड्स ऑफ फंड (FOF) देखील आहेत. कोटक असेट मॅनेजमेंट कंपनीने देखील 'Silver ETF' सादर करण्यासाठी सेबीकडे प्रस्ताव सादर केला आहे.ऑगस्टच्या सुरुवातीला डीएसपी म्युच्युअल फंड, एचडीएफसी म्युच्युअल फंड यांचे 'Silver ETF' बंद झाले होते. एडलवाईज गोल्ड अँड सिल्व्हर ईटीएफ फंड ऑफ फंड सध्या सुरु आहे.

मॉर्निंगस्टार या संस्थेच्या आकडेवारीनुसार 31 जुलै 2022 अखेर 'Silver ETF'मध्ये जवळपास 1400 कोटींची गुंतवणूक झाली आहे.सेबीने नोव्हेंबर 2021 मध्ये 'Silver ETF'ला परवानगी दिली होती. त्यानंतर आघाडीच्या फंड कंपन्यांनी 'Silver ETF'योजनांना प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे. 'Silver ETF'मध्ये गुंतवणूकदाराला बाजाराच्या वेळेत चांदीमध्ये डिजिटल माध्यमातून गुंतवणूक करण्याची संधी मिळते. खरेदी केलेली चांदीचा पुन्हा सहजपणे व्यवहार करता येतो.  

Gold ETF प्रमाणेच 'Silver ETF' गुंतवणूकादारांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. 'Silver ETF' योजनेतील निधी हा म्युच्युअल फंडांकडून चांदी आणि चांदीशीसंबधित संसाधनांमध्ये गुंतवण्यात येतो. सध्याच्या काळात सोने आणि चांदी ही लोकप्रिय गुंतवणूक साधने असल्याचे सिद्ध झाले आहे कारण ते महागाईविरूद्ध संरक्षण करतात.या मौल्यवान धातूंचा इक्विटीशीही कमी संबंध असतो आणि त्यामुळे तुम्हाला अधिक चांगले वैविध्य मिळते.  

बहुविध उपयोगी आहे चांदी

नवीन युगातील तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर वाढत आहे. सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंचा पुरवठा मर्यादित आहे.त्यांची मागणी खूप वेगाने वाढत आहे.विशेषत:चांदीच्या मागणीला इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या नवीन-युगातील तंत्रज्ञानाच्या मागणीचा फायदा होऊ शकतो.इलेक्ट्रिक वाहने,स्मार्टफोन आणि सौर पॅनेल आणि फाईव्ह-जी या नवीन-युगातील तंत्रज्ञानासाठी चांदीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे आतापासूनच चांदीमध्ये केलेली गुंतवणूक भविष्यात फायदेशीर ठरु शकते. 

पोर्टफोलिओतील जोखीम कमी करण्यासाठी 'Silver ETF' आवश्यक

वैविध्यपूर्ण चांगले लाभ मिळणार असल्याने 'Silver ETF' मधील गुंतवणूक चांगला पर्याय ठरत आहे.इक्विटी पोर्टफोलिओमध्‍ये वैविध्यता ठेवण्यासाठी आणि अस्थिरता कमी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी Silver ETF आदर्श ठरत असल्याचे जाणकार सांगतात. सिल्वर ईटीएफमध्ये आपण शंभर रुपयाने गुंतवणूक सुरू करू शकता. एखाद्या कंपनीचा एनएफओ सुरू असेपर्यंत प्रारंभिक किंमतीत त्याची खरेदी करता येऊ शकते. एनएफओ बंद झाल्यानंतर तो स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड होतो. अशा स्थितीत   गुंतवणूकदार ब्रोकरच्या माध्यमातून सिल्वर ईटीएफची खरेदी बाजारातून करू शकतात.