मुलांच्या भविष्यासाठी अगदी सुरुवातीपासूनच आर्थिक गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. विशेष करून मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी आधीपासूनच पैशांची बचत केल्यास याचा खूपच फायदा मिळेल. सध्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. यामागचे प्रमुख कारण म्हणजे यामध्ये गुंतवणूक करणे हे सर्वसामान्यांना देखील शक्य आहे. तुम्ही मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी चाइल्ड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता.
Table of contents [Show]
चाइल्ड म्युच्युअल फंड्स म्हणजे आहे?
चाइल्ड म्युच्युअल फंड्स हा म्युच्युअल फंडचाच एक प्रकार आहे. या माध्यमातून पालकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते. हे फंड्स हायब्रिड प्रकारात मोडतात व याद्वारे इक्विटी व रोख्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
यामध्ये एका मुलाच्या नावाने यात गुंतवणूक करू शक्य आहे. तसेच, एकापेक्षा अधिक मुले असल्यास संयुक्त खाते देखील उघडता येते. मुलांची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना यातून परतावा मिळतो. चाइल्ड म्युच्युअल फंड्स हे सर्वसाधारणपणे लॉक इन पीरियड्ससह येतात. याचा कालावधी हा 5 वर्षांपासून ते 15 वर्षांपर्यंत देखील असू शकतो. काही चाइल्ड म्युच्युअल फंड्समधून तुम्ही मुदतीपूर्वी बाहेर पडू शकता, परंतु यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागू शकते. या फंड्सचे वैशिष्ट्ये म्हणजे आजी-आजोबा देखील नातवांच्या नावाने यात गुंतवणूक करू शकतात.
चाइल्ड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीचे फायदे
चाइल्ड म्युच्युअल फंड्सचा मुळ उद्देश हा भविष्यातील योजना जसे की मुलांचे शिक्षण, लग्न व व्यवसायासाठी आर्थिक बचत करणे हा आहे. तुम्ही यामध्ये गुंतवणूक करून मुलांचे भविष्य आधीपासूनच सुरक्षित करू शकता. याशिवाय, तुमच्या पोर्टफोलियोमध्ये विविध आणून दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्देशाने देखील चाइल्ड म्युच्युअल फंड्स फायद्याचे ठरतात.
तुम्ही दीर्घकालीन उद्देशाने अवघ्या 500-1000 रुपये दरमहिना एसआयपीएच्या माध्यमातून भरून शकता. यामुळे 5 ते 10 वर्षानंतर मुलांच्या भविष्यासाठी मोठी रक्कम तुमच्या हातात उपलब्ध असेल.
मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी होईल फायदा
तुम्ही जर मुलांच्या उच्च शिक्षणाचा अथवा शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याचा विचार करत असाल तर आधीपासूनच चाइल्ड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
समजा, भविष्यात मुलांना उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपये खर्च येणार आहे, असे गृहीत धरूया. यासाठी तुम्हाला 10 वर्षांसाठी दरमहिन्याला 5 हजार रुपये चाइल्ड म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे, तुम्हाला 12 टक्के परतावा मिळाल्यास 10 वर्षानंतर 11 लाख 61 हजार रुपये मिळतील. तुम्ही या पैशांचा वापर मुलांच्या शिक्षण, लग्नासाठी करू शकता.
योग्य चाइल्ड म्युच्युअल फंडची निवड करा
गुंतवणूक करण्याआधी योग्य चाइल्ड म्युच्युअल फंडची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही फंडने मागील काही वर्षात दिलेला परतावा, फंडचा कालावधी, खर्चाचे प्रमाण (Expense Ratio), फंड मॅनेजर याबाबत संपूर्ण माहिती घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घेऊ शकता.
लक्षात घ्या की, मुलांच्या भविष्यासाठी केवळ चाइल्ड म्युच्युअल फंडमध्येच गुंतवणूक करण्याची गरज नाही. तुम्ही जास्त परतावा देणाऱ्या इतरही फंड्समध्ये सहज गुंतवणूक करू शकता. मात्र, अनेकजण इतरांच्या तुलनेत मुलांच्या भविष्याचा विचार करून चाइल्ड म्युच्युअल फंडमध्ये सातत्याने गुंतणूक करतात. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणुकीच्याबाबतीत शिस्तबद्ध असाल तर कोणत्याही फंडमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.