विमा, बँकिंग, वाहननिर्मिती, रिटेल, आरोग्य यासह अर्थव्यवस्थेतील अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर वाढत आहे. आपल्या ग्राहकांना उत्पादन आणि सेवांचा आगळावेगळा अनुभव देण्यासाठी कंपन्या प्रयत्नशील आहेत. नुकतेच बंगळुरु विमानतळावरील एक टर्मिनल मेटाव्हर्स अनुभवावर आधारित बनवण्यात आला आहे. या विमानतळाची सैर ग्राहक घरातूनही करु शकतात. ओपन AI ही कंपनीही मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन तयार करण्यात आलेल्या सेवा आणि उत्पादनांचा वापर येत्या काळातही वाढणार आहे. त्यामुळे या बाबत धोरण आणण्याची गरज आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.
AI चा वापर कुठे वाढतोय?
आर्थिक जोखीम ओळखण्यासाठी फायनान्शिअल सेवा देणाऱ्या कंपन्या AI चा वापर करत आहेत. तर आरोग्य क्षेत्रात रोगाचे निदान करण्यासाठी, गेमिंग, औषधनिर्मिती, विमा, रिटेल, मनोरंजन, सोशल मीडिया या क्षेत्रांमध्येही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. विविध प्रकारे या सेवांचा वापर मागील काही वर्षात वाढला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या विकासामुळे नोकऱ्या कमी होतील, ही भीतीही व्यक्त केली जात आहे.
AI वर धोरण आखण्याची गरज आहे का?
खरे तर AI क्षेत्रावर धोरण आणण्याची मागणी या क्षेत्रातील तज्ज्ञ करत आहेत. कारण, त्यामुळे या सेवांची निर्मिती आणि वापर कंपन्यांकडून जबाबदारीने केला जाईल. AI क्षेत्रातील कंपन्यांकडून अशा पद्धतीने अल्गोरिदम डिझाइन करण्यात येत आहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात वृद्धी होईल. मात्र, असे करताना नागरिकांच्या सुरक्षेचा विचार केला जात नाही. याचे नुकतेच एक उदाहरण देखील सर्वांच्या समोर आले. सियाटल येथील एका शाळेने बड्या सोशल मीडिया कंपन्यांवर खटला भरला आहे. या कंपन्यांचे अल्गोरिदम अशा पद्धतीने तयार केले आहेत की त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर जास्त होईल, असे शाळेने खटला दाखल करताना म्हटले आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे व्यक्तीच्या आवडीनिवडी काय आहेत, कोणत्या गोष्टींवरती तो जास्त वेळ खर्च करतो, व्यक्तीचे कल अचून जाणून घेता येतात. मात्र, याचा अतिरेकी वापर फक्त व्यवसायांच्या फायद्यासाठी केला गेला तर नागरिकांची दिशाभूल होऊ शकते. फक्त एकाच प्रकारची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाऊ शकते. हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. त्यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.