Shark Tank : शार्क टँक भारतातला पहिला बिझनेस संबंधित रिअॅलिटी शो. या कार्यक्रमामुळे देशभरातील छोट्या स्टार्ट-अप्सना गुंतवणूक मिळवण्यासाठी, आपला व्यवसाय लोकांसमोर मांडण्यासाठी एक चांगली संधी मिळाली. अनेक अशा स्टार्ट-अप्समध्ये शार्क टँक मधील गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करून नवी दिशा आणि उभारी दिली आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातल्या स्टार्ट अप्सनी सहभाग घेतला होता. त्यापैकी हेल्थ केअर सेक्टरमधल्या दोन स्टार्ट - अप्सच्या यशावर आपण आज बोलणार आहोत.
शार्क टँकमधील हेल्थकेअर क्षेत्रातल्या शार्क नमिता थापर यांनी दोन हेल्थ केअर सेक्टरमधल्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली होती. या दोन्ही कंपनीच्या संस्थापकांनी नुकताच नमिता थापर यांची मुंबईतल्या एमक्योरच्या ऑफिस मध्ये भेट घेतली. या भेटी दरम्यान थापर यांनी या दोन्ही कंपनीच्या प्रोग्रेस रिपोर्टवर चर्चा केली. पाहुयात शार्क टँक मुळे या दोन कंपनीच्या प्रोग्रेसमध्ये काय फरक पडला.
स्पंदन इसीजी डिव्हाइस
सनफॉक्स टेक्नॉलॉजीचे संस्थापक रजत जैन यांनी स्पंदन या नावाचे पोर्टेबल ECG डिव्हाइस तयार केलं आहे. ज्याप्रमाणे आपण घरात आपला ब्लडप्रेशर वा शुगर तपासू शकतो. त्याचप्रमाणे, या डिव्हाइसच्या माध्यमातून आपण घरबसल्या आपला ECG करु शकतो. आपल्या हृदयाचे आरोग्य तपासून योग्य त्यावेळी औषधोपचार करून घेऊ शकतो. शार्क टँकच्या या पहिल्या सीझनमध्ये सर्व शार्कंनी या डिव्हाइस मध्ये एकत्रित 1 कोटीची गुंतवणूक केली होती. यानंतर सनफॉक्स टेक्नॉलॉजी आणि एमक्योरने एकत्र केदारनाथ येथील यात्रे वेळी स्पंदनच्या मदतीने अनेक यात्रेकरूंची हृदयाची तपासणी करुन त्यांना योग्य वेळी उपचार मिळवून दिले होते. स्पंदनला शार्क टँक कडून मिळालेली गुंतवणूक व शार्क्सच्या माध्यमातून मिळालेल्या मार्गदर्शनानंतर त्यांच्या प्रती महिन्याच्या 50 लाखाची विक्री होत आहे.
जनित्री - प्रेग्नेंसी मॉनिटरिंग डिव्हाइस
अरुण अग्रवाल यांनी जनित्री - प्रेग्नेंसी मॉनिटरिंग डिव्हाइस तयार केलं आहे. गरोदरपणाच्या काळात बाळाचे हृदयाचे ठोके व त्याच्या हालचालीबद्दल प्रमाण रिपोर्ट मिळत राहावा. त्याचे सातत्याने मॉनिटरिंग करत राहून योग्य वेळी डिलीव्हरी व्हावी. यासाठी या डिव्हाइसची निर्मिती केली आहे. जेणेकरून भारतातल्या बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे हा यामागचा उद्देश आहे. अरुण अग्रवाल यांनी शार्क टँकच्या दुसऱ्या सीझन मध्ये भाग घेतला होता. यावेळी नमिता थापर यांनी 2.5 टक्के इक्विटी साठी 1 कोटी रूपये गुंतवले आहेत. आज जनित्रीच्या विक्रीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून. सुरूवातीला जेथे 10 लाखाची विक्री होत असे आज त्याठिकाणी एम्याक्योरच्या साहय्याने 50 लाखाची विक्री होत आहे.