सेवा निर्यात चालू आर्थिक वर्षात 300 अब्ज डॉलर ओलांडू शकते. जागतिक संधींचा फायदा घेऊन भारत 2030 पर्यंत सेवा निर्यातीचे एक ट्रिलियन डॉलर्सचे लक्ष्य गाठू शकतो. सेवा निर्यात प्रोत्साहन परिषदेचे महासंचालक अभय सिन्हा यांनी रविवारी सांगितले की, आगामी परकीय व्यापार धोरण (FTP) मधील उपायांमुळे सेवांची निर्यात आणखी वाढण्यास मदत होईल. वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत म्हणजेच एप्रिल-जानेवारी या कालावधीत सेवा निर्यात 272 अब्ज डॉलर झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ती 206.28 अब्ज डॉलर इतकी होती.
2030 पर्यंत भारताची एकूण निर्यात 1 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे जाईल. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत कांद्याची निर्यात 16.3 टक्क्यांनी वाढून 523.8 दशलक्ष डॉलर झाली आहे. डिसेंबर 2022 मध्ये ती 50 टक्क्याने वाढून 52.1 दशलक्ष डॉलर झाली होती. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत असे म्हटले आहे की, भारतातून कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. या संदर्भातील विधान खरे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कांदा निर्यातीच्या संदर्भात आलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सेवा क्षेत्राचे योगदान (Indian services sector)
भारताचे सेवा क्षेत्रातील योगदान यापूर्वीच अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (GDP) 50 टक्केपेक्षा अधिक योगदान सेवाक्षेत्राकडून देण्यात आले आहे. केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये ही बाब प्रामुख्याने अधोरेखित झालेली दिसून आली. चालू वित्त वर्षाच्या पूर्वार्धात सेवाक्षेत्रात संथ व सातत्यपूर्ण वाढ होत गेल्याचेही हा अहवाल सांगतो. "2021-22 च्या पहिल्या सहामाहीत सेवाक्षेत्रात वर्षाकाठी 10.8 टक्के इतकी वाढ (services sector growth) झाली" असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाविषयी (Commerce Ministry)
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून दोन विभाग चालवले जातात. वाणिज्य व उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग जे पूर्वीचे ‘औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग’ प्रशासित केले जाते. या मंत्रालयाचा प्रमुख हा कॅबिनेट दर्जाचा मंत्री असतो. केंद्र सरकारमधील वाणिज्य आणि उद्योग मंत्री हे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे प्रमुख आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक आहेत. स्वतंत्र भारताचे पहिले वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी हे होते. सध्याचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे पीयूष गोयल हे आहेत. गोयल यांनी 31 मे 2019 रोजी सुरेश प्रभू यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे.