Senior Citizen Saving Scheme: ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही केंद्र सरकारची एक बचत योजना आहे. या योजनेमध्ये गुंतवणुकीवर 8 टक्के व्याज मिळते. विशेष बाब म्हणजे, यावर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने या योजनेतील गुंतवणुकीची रक्कम 15 लाखांवरून 30 लाख रुपये केली. त्यामुळे तुम्हाला अधिक गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवण्याची संधी मिळणार आहे. या योजनेंतर्गत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडता येते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीची एक सरकारी बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीवर इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील उपलब्ध आहे. SCSS योजनेमध्ये एकूण व्याज 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच त्यातून मिळणारे व्याज हे करपात्र (Interest Taxable) आहे. ज्येष्ठ नागरिकांना या सरकारी योजनेवर सर्वाधिक व्याज मिळते.
5 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी
'ज्येष्ठ नागरिक बचत योजना' या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना या योजनेत त्यांची बचत किमान 5 वर्षे ठेवावी लागते. तसेच या योजनेचा मॅच्युरिटी (Maturity) कालावधी 3 वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो. अशाप्रकारे या योजनेचा कालावधी जास्तीत जास्त 8 वर्षांचा असू शकते. 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि ते खाते बंद झाल्यानंतर नवीन खाते सुरू करता येते.
तीन महिन्यांनी व्याज ठरते
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवलेल्या पैशांवरील व्याजाचे पैसे प्रत्येक महिन्याला मिळत नाहीत. ते प्रत्येक तीन महिन्यांनी मिळतात. उदाहरणार्थ, एखाद्याने 15 मार्च रोजी या योजनेत गुंतवणूक केली असेल तर त्याला 30 मार्च रोजी 15 दिवसांच्या व्याजासह पैसे मिळतील. यानंतर, तुम्हाला नियमितपणे निश्चित रक्कम मिळते. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज निश्चित केले जाते. सरकारने आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी डिसेंबरमध्ये व्याजदरात वाढ केली होती. आता हा नवा दर 2023 च्या पहिल्या तिमाहीत SCSS खात्यात जमा केलेल्या पैशांवर लागू होईल. केंद्र सरकार या महिन्याच्या अखेरीस ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याजदरात पुन्हा एकदा सुधारणा करू शकते.
समजा, तुम्ही या योजनेत 15 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीत 30,000 रुपये मिळतील. त्यानुसार, 5 वर्षांच्या या योजनेत तुम्हाला एकूण 6 लाख रुपये परतावा मिळू शकतो. जर तुम्ही 30 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला प्रत्येक तिमाहीत 60,000 रुपयांचा परतावा मिळेल. अशाप्रकारे 5 वर्षानंतर एकूण 12 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.