Share Market Investment: भांडवली बाजारात नक्की कोणत्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी असा प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदाराला सतत पडतो. अर्थव्यवस्थेत बँक, निर्मिती, मनोरंजन, सेवा, फार्मा यासह इतर अनेक क्षेत्रे आहेत. गुंतवणूक केलेली कंपनी कोणत्या क्षेत्रातील आहे? हे क्षेत्र तेजीत आहे की मंदीत आहे. भविष्यात या क्षेत्राची वाढ किती होईल हे सहज लक्षात येत नाही.
तसेच कोणतेही सेक्टर सदासर्वकाळ तेजीत किंवा मंदीत राहत नाही. जागतिक घडामोडी, अर्थव्यवस्थांतील बदलांमुळे यात चढउतार होत असतात. कोरोना काळात फार्मा, आयटी सेक्टर कंपन्यांना डिमांड होती तर मनोरंजन आणि सेवा क्षेत्र खाली आले होते.
भविष्यात कोणती पाच क्षेत्रे चांगला परतावा देऊ शकतात. यावर अर्थतज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. पाहूया ही पाच क्षेत्रे कोणती आहेत.
ऑटो सेक्टर (Auto Sector)
ऑटोमाबाईल क्षेत्राची भारतामध्ये वेगाने वाढ होत आहे. निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्राच्या एकूण जीडीपीपैकी ऑटो क्षेत्राचा वाटा 50% आहे. तर देशाच्या एकूण जीडीपीपैकी ऑटो क्षेत्राचा वाटा 7.1% आहे. 2010 ते 2017 या कालावधीत ऑटो कंपन्यांची भरभराट झाली. मात्र, कोरोना काळात हे क्षेत्र पुन्हा खाली आले होते.
www.economictimes.indiatimes.com
गाड्यांची घटलेली विक्री, सरकारची नवी प्रदूषण नियमावली, सुटे पार्ट्स आणि कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ, वाहन विमा किंमतवाढ यामुळे ऑटो क्षेत्र मंदीत सापडले होते. मात्र, आता कोरोनानंतर हे क्षेत्र पुन्हा उभारी घेत आहे. या क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.
निफ्टी 50 निर्देशांकात ऑटो कंपन्यांचा वाटा 5.29% आहे. यात मारुती सुझुकी, महिंद्रा, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, आयशर, हिरो मोटो कॉर्प अशा कंपन्यांचा सर्वाधिक वाटा आहे. भारतातील वाहनांची मागणी वाढत असून पुढील पाच वर्षात या क्षेत्रातील कंपन्यांमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो.
बँकिंग सेक्टर (Banking Sector)
अर्थव्यवस्था आणि बँकिंग क्षेत्राचा थेट संबंध आहे. अर्थव्यवस्था पुढे जात असताना बँकिंग क्षेत्राचीही वाढ होत असते. 2002-07 सालादरम्यान अर्थव्यवस्थेबरोबरच बँकिंग क्षेत्रही तेजीत होते. मागील एक वर्षात अनेक सरकारी आणि खासगी क्षेत्रातील मोठ्या बँकांनी चांगली कामगिरी केली आहे. अनुत्पादित कर्ज हा बँकांसाठी चिंतेचा विषय आहे मात्र, सरकारी मदतीनंतर आता NPA सुद्धा कमी होत आहे.
www.businessworld.in
निफ्टी 50 निर्देशांकात बँकिंग क्षेत्राचा वाटा 27.32% आहे. यापैकी एचडीएफसी बँक 9.31%, आयसीआयसीआय बँक 8.04%, कोटक बँक 3.34%, अॅक्सिस बँक 3.08% सह इतरही मोठ्या बँका आघाडीवर आहेत.
सद्यस्थितीत स्टॉक एक्सचेंजवर 12 सार्वजनिक बँका आणि 30 बड्या खासगी बँका आहेत. युनियन बँक, बँक ऑफ बडोदाची मागील एक वर्षातील कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील चांगल्या बँकांमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता.
FMCG सेक्टर
फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स म्हणजेच FMCG क्षेत्र. ग्राहकांना दररोज लागणारे अन्नपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या या क्षेत्रात येतात. भारताची बलाढ्य लोकसंख्या पाहता अनेक बहुराष्ट्रीय FMCG कंपन्यांनी भारतीय बाजार काबीज केला आहे. FMCG क्षेत्राचे चार उपविभाग पडतात. घरगुती वस्तू आणि पर्सनल केअर कंपन्यांचा FMCG मधील वाटा 50% आहे. तर हेल्थकेअर आणि अन्नपदार्थ संबंधित कंपन्यांचा वाटा अनुक्रमे 31% आणि 19% आहे.
2022 वर्षात FMCG क्षेत्रातील कंपन्यांच्या एकूण विक्रीपैकी 65% विक्री शहरी भागात झाली होती. निफ्टी 50 निर्देशांकात FMCG कंपन्याचा वाटा 9.58% आहे. यापैकी ITC, नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया आणि टाटा कन्झ्युमर या कंपन्याचा सर्वाधिक वाटा आहे. पुढील सहा ते बारा महिन्यात FMCG क्षेत्रातील कंपन्या तेजीत राहतील, असे जाणकारांचे मत आहे.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र ( IT Sector)
कोरोनाकाळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा नफा वाढला होता. मात्र, सद्यस्थितीत या कंपन्यांना उतरती कळा लागली आहे. अनेक कंपन्यांचा नफा रोडावला असून व्यवसाय कमी झाला आहे. मात्र, येत्या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र पुन्हा उभारी घेईल असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 2020 आणि 2021 वर्षात निफ्टी IT इंडेक्सने चांगली कामगिरी केली होती. मात्र, 2022 मध्ये IT इंडेक्स 25 टक्क्यांनी खाली आला होता.
www.tfipost.com
निफ्टी 50 निर्देशांकात इन्फोसिस, एचसीएल, विप्रो, टीसीएस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांचा सर्वाधिक वाटा आहे. एकूण निफ्टी 50 मध्ये IT क्षेत्राचा वाटा 14.11% आहे. मागील वर्षभरात एकंदर आयटी क्षेत्र 15 टक्क्यांनी खाली आले आहे. त्यामुळे शेअर्सचे भाव खाली असताना या क्षेत्रातील कंपन्यांत गुंतवणूक करण्याची संधी आहे. मात्र, अमेरिकेतील अर्थव्यवस्था सुरळीत होईपर्यंत या क्षेत्रातील कंपन्यांना जास्त प्रगती करता येणार नाही, असे दिसते. अमेरिकन अर्थव्यवस्था सुरळीत झाल्यानंतर आयटी क्षेत्र पुन्हा उभारी घेईल.
फार्मा क्षेत्र (Pharma sector)
प्रॉडक्शन( निर्मिती) क्षेत्राचा विचार करता भारतीय फार्मा क्षेत्र जगातील तिसऱ्या क्रमांकावर आहे. फार्मा क्षेत्र केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मिनिस्ट्री अंतर्गत येते. 2023 मध्ये मंत्रालयाने सादर केलेल्या एका अहवालानुसार 2021-22 मध्ये भारतीय फार्मा क्षेत्र 3 लाख 44 हजार 125 कोटींचे आहे. 60 हजारांपेक्षा जास्त जेनेरिक ब्रँडच्या औषधांची निर्मिती भारतात होते. जगभरातील जेनेरिक औषधांच्या बाजारपेठेत भारताचा वाटा 20% आहे. 2009 ते 2016 या कालावधीत फार्मा क्षेत्राची वाढ 30% (CAGR) वार्षिक दराने झाली.
सनफार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डी आणि डिव्हिस लॅब या कंपन्यांचा निप्टी 50 निर्देशांकात सर्वाधिक वाटा आहे. तर निफ्टी 50 निर्देशांकात एकूण फार्मा क्षेत्राचा वाटा 3.22% आहे. सध्याचे फार्मा कंपन्यांचे मूल्य चांगले आहे. पुढील 12 महिन्यात फार्मा कंपन्यांचा नफा आणखी वाढेल. ब्रँडेड कंपन्याचा नफा 30%-90% दरम्यान वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे चांगल्या फार्मा कंपन्यांमधील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते, असा अंदाज तज्ज्ञ वर्तवत आहेत.
डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स, म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)