अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या मालकीची रिलायन्स कॅपिटल (Reliance Capital) या कंपनीवर दिवाळखोरीची (Bankruptcy) प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार, ही कंपनी विकत घेण्यासाठीच्या हालचाली गेली वर्षभर सुरू आहेत. शेवटी लिलाव पद्धतीने ही विक्री करायचं ठरल्यावर 21 डिसेंबरला पहिला लिलावही पार पडला आहे. आणि यात टोरंट इन्व्हेस्टमेंट (Torrent Investments) कंपनीने सर्वाधिक 8,640 कोटी रुपयांची सर्वोत्तम बोली लावली . त्या खालोखाल हिंदुजा समुह (Hinduja Industries) आणि इंडसइंड बँकेनं (IndusInd Bank) प्रमोट केलेला एक गट अशा बोली लागल्या.
लिलावाच्या बातमीनंतर शेअर बाजारात हा शेअर हिरव्या रंगात आहे.
आता बोली लावणाऱ्या काही कंपन्यांना दुसऱ्यांदा लिलाव हवा आहे. त्यामुळे कमी किमतीला कंपनी विकत घेणं शक्य होईल, असाच या कंपन्यांचा अंदाज आहे. 9500 कोटी रुपयांच्या मर्यादेच्या आत पुन्हा एकदा लिलाव व्हावा अशी मागणी काही कंपन्यांनी मिळून केली आहे. यावर मुंबई नॅशनल कंपनी लॉ ट्रुब्युनल (NCLT) ने बोली लावणाऱ्या कंपन्यांनी मतदान करून लिलावाचा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.
म्हणजे लिलावाच्या बाजूने असलेली मतं जास्त असतील तर दुसऱ्यांदा लिलाव घेण्यात येईल. आणि लिलावाच्या विरोधातली मतं जास्त असतील तर लिलाव पुन्हा घेतला जाणार नाही.
पहिल्या फेरीत टोरन्ट इन्व्हेस्टमेंटने सर्वाधिक बोली लावली होती. त्यामुळे अर्थातच, त्यांना दुसरी फेरी नको आहे. रिलायन्स कॅपिटल दिवाळखोरी जाहीर केली तेव्हा कंपनीचं मूल्यांकन 12,500 ते 13,000 कोटी इतकं होतं. पण, आता तेवढी किंमत कंपनीला मिळत नाहीए.