सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) 7 कंपनींच्या एकूण 15 मालमत्तांचा लिलाव (Property auction ) करणार आहे. या कंपन्यांनी गुंतवणूकदारांकडून बेकायदेशीरपणे रक्कम जमा केलेली वसूल करण्यासाठी हा लिलाव करण्यात येणार आहे. सनहेवन अॅग्रो इंडिया आणि रविकिरण रियल्टी इंडिया यासह सात कंपन्यांच्या एकूण 15 मालमत्तांचा 21 ऑगस्ट रोजी लिलाव केला जाणार आहे. सेबीने मंगळवारी याबाबत एक पत्रक जारी केले आहे.
सेबीकडून करण्यात येणाऱ्या या मालमत्तांच्या लिलावामध्ये इन्फोकेअर इन्फ्रा, भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीज लिमिटेड, जीएसएचपी रियलटेक लिमिटेड, जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया लिमिटेड आणि न्यूलँड अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या काही मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे. या सात कंपन्यांनी पब्लिक इश्यू नियमांचे पालन न करता गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले होते.
जमीन आणि निवासी इमारतीचा लिलाव
या मालमत्तेमध्ये पश्चिम बंगालमधील जमीन आणि निवासी इमारतीचा समावेश आहे. 15 मालमत्तांपैकी 4 भारत कृषी समृद्धी इंडस्ट्रीजशी संबंधित आहेत, तसेच जस्ट-रिलायबल प्रोजेक्ट्स इंडिया आणि न्यूलँड अॅग्रो इंडस्ट्रीज यांच्या प्रत्येकी तीन आहेत. तर दोन सनहेवन आणि रविकिरण रियल्टी इंडिया, इन्फोकेअर इन्फ्रा आणि GSHP रियलटेक यांच्या प्रत्येकी एक मालमत्तेचा समावेश आहे.
13 कोटींची राखीव किंमत
या मालमत्तांच्या लिलावासाठी 13 कोटी रुपयांची राखीव किंमत ठेवण्यात आली असल्याचे सेबीने सांगितले. सात कंपन्या आणि त्यांचे संचालक आणि प्रवर्तक यांच्या मालमत्तांमध्ये निवासी इमारती तसेच पश्चिम बंगालमधील जमिनीचा समावेश आहे. मालमत्तांचा 21 ऑगस्ट रोजी ऑनलाइन लिलाव केला जाईल.
लिलाव ऑनलाइन होणार
पब्लिक इश्यूच्या नियमांचे पालन न करता पैसे उभारल्याबद्दल त्यांना दोषी मानून सेबीने वसुलीची ही कारवाई सुरू केली आहे. बोलीदारांना लिलावासाठी आमंत्रित करताना सेबीने सांगितले की, मालमत्तांचा लिलाव सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत ऑनलाइन माध्यमातून केला जाईल.