सिक्युरिटीज अॅण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (Securities and Exchange Board of India-SEBI) बिर्ला पॅसिफिक मेडस्पा (Birla Specific Medspa Limited) आणि यशोवर्धन बिर्ला (Yashovardhan Birla) यांच्यासह 10 संस्थांवर 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी सेबीने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सेबीने त्यांच्यावर ही कारवाई केली. बिर्ला पॅसिफिक मेडस्पा लिमिटेड कंपनीने आयपीओमधून (Initially Public Offer-IPO) काही पैसे वळवले होते.
सेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा लिमिटेड कंपनीला (BPML) 1.07 कोटी, अभिजित देसाईला 32 लाख, पीव्हीआर मूर्तीला 26 लाख आणि यशोवर्धन बिर्ला, व्यंकटेश्वरलू नेलाभोटला, मोहनदास अडिगे, अनोज मेनन, राजेश शाह, उपकार सिंग कोहली आणि तुषार डे यांना प्रत्येकी 25 लाखांचा दंड ठोठावला आहे.
सेबीने बिर्ला पॅसिफिक मेडस्पा आणि यशोवर्धन बिर्ला यांच्यासह 10 कंपन्यांना लिस्टिंग करारांचे उल्लंघन केल्याबद्दल 3.42 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. आयपीओचे पैसे चोरून ते इतर कंपन्यांमध्ये वळवल्याबद्दल त्यांना हा दंड ठोठावण्यात आला आहे. सेबीने ने 7 ते 15 जुलै, 2011 या कालावधीत BPML च्या IPO ची तपासणी केल्यानंतर हे आदेश जारी केले. बीपीएमएलचा शेअर बीएसईवर 7 जुलै 2011 रोजी सूचीबद्ध करण्यात आला होता. तर याचा आयपीओ 20 ते 23 जून 2011 या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला होता.
कंपनीने सेबीकडे जमा केलेल्या कागदपत्रांनुसार, IPO मधून मिळालेले सर्व पैसे भारतात 55 हेल्थ केअर क्लिनिक्स उभारण्यासाठी वापरायचे होते. पण कंपनीने तसे न करता आयपीओमधून जमा झालेला 34.91 कोटी रुपयांचा निधी इतर गोष्टींसाठी वापरला. याशिवाय IPO मधून 31.54 कोटी रुपयांची रक्कम विविध समूह कंपन्यांना इंटर कॉर्पोरेट ठेवी (ICDs) म्हणून देण्यात आली. या कंपन्यांनी बीपीएमएलला 18.54 कोटी रुपये परत केलेले नाहीत. तसेच त्यांनी बीपीएमएलला 6.39 कोटी रुपयांचे व्याज देणं अपेक्षित होतं. ते सुद्धा दिलेलं नाही.