शेअर बाजार नियामक संस्था सेक्युरिटीज् एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अर्थात सेबीने अलीकडेच शेअर बाजारातला (Stock Exchange) एक छोटा घोटाळा उघडकीला आणला आहे . आणि त्यासाठी जबाबदार असित मेहता इंटरमिडिअरीज् (Asit Mehta Intermediaries) कंपनीला 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही कंपनी सेबीकडे नोंदणी झालेली ब्रोकरेज कंपनी आहे.
असित मेहता ब्रोकरेज कंपनीच्या एप्रिल 2019 ते जुलै 2020 दरम्यानच्या व्यवहारांची चौकशी सेबी तसंच राष्ट्रीय शेअर बाजार आणि बाँबे स्टॉक एक्सचेंज यांच्याकडून सुरू होती. त्यात अनियमितता आढळल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने केलेला घोटाळा सात कोटी रुपयांच्या आसपास असावा असा अंदाज आहे.
त्यामुळे हे प्रकरण वेळीच उघड झाल्याबद्दल सजग शेअर गुंतवणूकदारांचे सेबीने आभार मानले आहे त. असित मेहता इंटरमिडिअरीवर आपल्या ग्राहकांनी विश्वासने गुंतवलेल्या पैशाचा गैरवापर करणं, फ्युचर आणि ऑपशन व्यवहारांमध्ये स्टॉक एक्सचेंजला चुकीची मार्जिन कळवणं, ग्राहकांना T2 म्हणजे सौदा पार पडल्यानंतरही अतिरिक्त मुदत देणं असे आरोप होते. आणि त्याची चौकशी झाल्यानंतर हे आरोप सिद्ध झाल्याचं सेबीनं आपल्या पत्रकात म्हटलंय.
असित मेहता यांच्या एका ग्राहकाने राधा माधव कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्येही कृत्रिम भाववाढ केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्यामुळे सोनल मेहता या ग्राहकावरही 5 लाखांच्या दंडाची कारवाई करण्यात आली आहे. राधा माधव कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमधली उलाढाल सप्टेंबर 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यानची आहे. याशिवाय लास्ट ट्रेडेड प्राईसशीही संगणकीकृत छेडछाड झाल्याचं सेबीच्या चौकशीत सिद्ध झालं आहे. आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
असित मेहता इंटरमिडिअरीज् तसंच फायनान्स सर्व्हिसेस ही मोठी ब्रोकरेज आणि वित्तविषयक संस्था असून ती ISO प्रमाणित आहे. 1984 मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेचे हजारो ग्राहक आहेत.