आपल्या प्रत्येकाचे बँकेत खाते आहे. याच खात्याच्या मदतीने अनेक आर्थिक व्यवहार चुटकीसरशी पूर्ण करता येतात. बँकेतील खात्यांचे देखील अनेक प्रकार आहेत. या प्रकारानुसार त्यावर मिळणाऱ्या सुविधाही वेगवेगळ्या आहेत. पगार खाते (Salary Account), चालू खाते ( Current Account) आणि बचत खाते (Saving Account) लोक बँकेत ओपन करू शकतात.
आपल्यापैकी प्रत्येकाकडे बचत खाते (Saving Account) हे असतेच. बऱ्याच वेळा आपण पैसे खर्च होतात म्हणून बचत खात्यावर ठेवतो. यामागील उद्देश हा बचत करणे असा असतो. अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याऐवजी बचत खात्यात पैसे ठेवण्याला प्राधान्य देतात. आपत्कालीन परिस्थितीत याच खात्यातील पैसे पटकन काढून अडचण सोडवता येते. पण या बचत खात्यात किती रक्कम ठेवता येऊ शकते. याबाबत आज माहिती जाणून घेऊयात.
बचत खात्यात किती रक्कम ठेवता येऊ शकते?
बहुतांश लोक बचत खात्यातच (Saving Account) पैसे ठेवतात आणि याच खात्यावरून आर्थिक व्यवहार (Financial Transaction) करतात. या खात्यावरील व्यवहार तपासले की, पैसे काढणे आणि भरण्याची नोंद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. परंतु या बचत खात्यात किती रक्कम ठेवता येऊ शकते, असा प्रश्न अनेकदा पडतो. त्याचे उत्तर सोपे आहे. बचत खात्यात किती रुपये ठेवावे याची कोणतीही लिमिट निश्चित करण्यात आलेली नाही. या खात्यात खातेदाराला हवी तितकी रक्कम शिल्लक स्वरूपात ठेवता येऊ शकते. मात्र बचत खात्यावरील शिल्लक ही आयटीआरच्या कक्षेत येत असेल, तर त्याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल.
इतक्या रकमेची द्यावी लागते माहिती
आयकर विभागाच्या रडारवर कोणालाही यायला आवडणार नाही. इनकम टॅक्स विभागामार्फत रोख ठेवींवर सक्रियपणे लक्ष ठेवले जाते. अनावश्यक त्रास टाळण्यासाठी नियमित मर्यादा जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (Central Board of Direct Taxes) कोणत्याही बँकेतील खातेधारकाच्या खात्यावर एका आर्थिक वर्षात 10 लाख रुपयांपेक्षा अधिक कॅश जमा होत असेल, तर त्याची माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसला देणे बंधनकारक केले आहे. 10 लाखांची ही मर्यादा मुदत ठेव योजना (FD), म्युच्युअल फंड (Mutual Fund), शेअर्स (Shares) किंवा बॉण्डची खरेदी (Bond Buying) तसेच फॉरेन करेन्सी (Foreign Currency) आणि फॉरेक्स कार्डसाठी (Forex Card) देखील लागू केली आहे.
Source: hindi.moneycontrol.com