Save Money on Groceries: महागाईचा जोर दिवसेंदिवस वाढतोय हे काही वेगळं सांगायला नको. किराणा, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थांच्या किंमती देखील कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. याचा सरळ ताण आपल्या सगळ्यांच्या मंथली बजेटवर पडतोय. तृणधान्य, दूध, फळे आणि भाजीपाला यांच्या किंमती देखील स्थिर नाहीत. अवकाळी पावसामुळे तर भाजीपाला अधिकच महाग होत चाललाय. अशातच पैशाचं नियोजन कसं करायचं? कोणत्या वस्तू कधी आणि कशा खरेदी करायच्या? बचतीचे कुठले मार्ग अवलंबले पाहिजेत यावर आपण या लेखात चर्चा करणार आहोत.
सहज करण्याजोग्या अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपण किराणा आणि भाजीपाल्यावरचा खर्च आटोक्यात आणू शकतो. जसं आपण गुंतवणुकीचं नियोजन करतो तसंच नियोजन खरेदी करताना देखील असायला हवं.चला तर मग जाणून घेऊयात अशाच काही टिप्स.
Table of contents [Show]
स्वयंपाकासाठी आवश्यक गोष्टींची यादी
होय, आजकाल अनेक लोक आठवड्यात आपण काय खाणार आहोत याचं नियोजन करायला लागले आहेत. आता तर नोकरीनिमित्त ऑफिसला जाणारे जोडपे प्रामुख्याने असे प्लॅन बनवायला लागले आहेत. यामुळे आठवड्याभरात आपल्याला कोणत्या भाज्या, कोणती फळं लागणार आहेत याचं नियोजन करता येतं. तसंच किराणामाल महिन्यातून एकदाच भरत असाल तरी आवश्यक त्याच गोष्टींची खरेदी करणे सोपे होते.
यामुळे अनावश्यक खर्च कमी होतो आणि भाजीपाला नासण्याचे, वाया जाण्याची शक्यता देखील कमी होते. अर्थात यामुळे पैशाची बचत होतेच.
एकट्याने खरेदी करा
किराणामाल आणण्यासाठी जर तुम्ही डीमार्ट, स्टार मॉल किंवा साध्या किराणा दुकानात जरी गेलात तर जे आवश्यक नाही अशा गोष्टी देखील आपण खरेदी करतो. आणि खरेदी करताना आपल्या सोबत जर कुणी असेल तर अनावश्यक खर्च वाढलाच म्हणून समजा! त्यावर एक उपाय म्हणजे, आवश्यक त्याच सामानाची यादी बनवा आणि शक्यतो एकटेच जाऊन किरणामाल खरेदी करा. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.
गर्दीच्या वेळी आणि घाईगडबडीत खरेदी करणे टाळा
शक्यतो शनिवार-रविवार हा वार टाळून किरणामाल किंवा भाजीपाला खरेदी करा. या दिवशी अनेकांना सुट्टी असल्याकारणाने दुकानांत, बाजारात खरेदीसाठी गर्दी असते. या गर्दीत आपणही घाईघाईने खरेदी करायला लागतो. त्यामुळे सामानाचे ब्रँड, त्यावर असलेल्या ऑफर्स, इतर ब्रँड्सच्या किंमतीत असलेला फरक तपासून घ्यायला वेळ मिळत नाही. त्यामुळे गर्दीच्या वेळी आणि घाईघाईने खरेदी करणे टाळावे.
शेतकऱ्यांकडून फळे आणि भाजीपाला खरेदी करा
किरणामाल खरेदी करताना त्यावरच्या ऑफर्स लक्षात घेता तुम्ही मॉलचा पर्याय निवडण्यास हरकत नाही. परंतु भाजीपाला खरेदी करताना शक्यतो शेतकऱ्यांकडूच खरेदी करा. त्याचे मुख्य कारण म्हणजे, शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भाजीपाला हा थेट बांधावरून आलेला असतो, त्यामुळे तो स्वस्त देखील असतो. पुर्णतः सेंद्रिय असलेला हा भाजीपाला आरोग्यासाठी देखील फायद्याचा असतो हेही लक्षात असू द्या.
सोबतच जर तुम्ही मांसाहारी असाल आणि चिकन,मटण आणि अंडी खात असाल तर ते देखील स्थानिक दुकानदाराकडूनच खरेदी करा. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ घेणे टाळाच, आरोग्यासाठी ते हानिकारक असते.
कॅल्क्युलेटर सोबत असू द्या
होय, आपण काय खरेदी करतोय, किती खरेदी करतोय याचा हिशोब आपल्याला खरेदी करतानाच यायला हवा. मॉलमध्ये ट्रॉली घेऊन आपण खरेदी करतो, वाट्टेल त्या वस्तू ट्रॉलीत टाकतो आणि बिलिंग काउंटरवर गेल्यावर लक्षात येतं की आपण बजेटपेक्षा अधिक सामान खरेदी केली आहे. या सगळ्या शक्यता टाळण्यासाठी कॅल्क्युलेटर सोबत असू द्या. तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील कॅल्क्युलेटर असते, सामान खरेदी करताना त्याचा वापर जरुर करा.
ऑफर्सवर लक्ष असू द्या
वेगवेगळे दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी निरनिराळ्या ऑफर्स देत असतात. सणासुदीच्या दिवसांत देखील किरणामाल, घरगुती वस्तूंवर ऑफर्स दिल्या जातात. सोबतच किराणा स्टोअर देखील त्यांच्या रेग्युलर ग्राहकांना लॉयल्टी पॉईंट्स किंवा रिवार्डस देत असतात. तुमच्या प्रत्येक खरेदीवर तुम्हांला काही पॉईंट्स मिळतात, जे तुम्ही रिडीम करू शकतात. अशा सगळ्या प्रकारच्या ऑफर्सवर लक्ष ठेवत चला. या सगळ्या बारीकसारीक गोष्टींचा विचार आणि नियोजन केले तर तुमच्या मंथली बजेटवर विशेष ताण पडणार नाही. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटत असल्या तरी त्यातून तुम्हांला मोठा फायदा होऊ शकतो. 'थेंबे थेंबे तळे साचे' ही म्हण तर तुम्हांला माहितीच आहे. तेव्हा किरणामाल किंवा भाजीपाला खरेदी करताना बचतीची सवय लावा आणि आर्थिक शिस्त देखील पाळा.