आखाती प्रदेशातील प्रमुख तेल उत्पादक देश असलेल्या सौदी अरेबियाने कच्च्या तेलांच्या किंमतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या किंमतीत कपात केली आहे. सौदीमधील सर्वात मोठी खनिज तेल उत्पादक सरकारी कंपनी सौदी अरामकोने आशिया आणि मध्य पूर्वेकडील देशांसाठी कच्च्या तेलाचा भाव कमी केला आहे.
जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडच्या किंमतीत मागील काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे ओपेकसह क्रूड उत्पादक देशांची अर्थव्यवस्था अडचणीत सापडली आहे. जून 2022 मध्ये क्रूड ऑइलचा प्रति बॅरला भाव 125 डॉलर इतका होता. त्यात सहा महिन्यांत जवळपास 30% घसरण झाली असून तो 80 डॉलर इतका खाली आला आहे. गेल्या आठवड्यात क्रूडच्या किंमतीत 7% घसरण झाली होती. त्यामुळे तेल उत्पादक देशांची चिंता वाढली आहे.
सौदी अरेबियातील सर्वात मोठी खनिज तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोने क्रूड ऑइलच्या किंमती कपात केली आहे.. आशियामध्ये फेब्रुवारी महिन्यात पुरवठा केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल 1.80 डॉलरची कपात करण्याचा निर्णय सौदी अरामकोने घेतला. कमॉडिटी बाजारातील कच्च्या तेलाच्या सध्याच्या किंमतींच्या तुलनेत हा दर 1.45 डॉलरने कमी आहे. सौदी अरामकोचा दर हा नोव्हेंबर 2022 मधील क्रूडच्या किंमतींपेक्षा कमी आहे.
आशियाबरोबरच पूर्व युरोप आणि मध्य पूर्वेकडील देशांसाठी देखील सौदी अरामकोने कच्च्या तेलाचा भाव कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेलाच्या मागणीला चालना मिळेल आणि साठा कमी होण्यास मदत होईल, असा अंदाज सौदी अरामकोच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. सौदी अरेबियातून निर्यात होणाऱ्या 60% क्रूड ऑइल आशियामध्ये पुरवले जाते. दर कपातीने आशियातील देशांना फायदा होणार आहे.
कमॉडिटी बाजारात क्रूड स्वस्त होण्यामागे ही आहेत कारणे
तेलाच्या किंमतींमध्ये घसरण होण्यामागे केवळ मागणी कमी होणे हे एकमेव कारण नाही. अमेरिका आणि युरोपातील मंदी आणि तिथल्या इंधन मागणीवर झालेला परिणाम, डॉलरचे मूल्य इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होणे आणि सेंट्रल बँकांची महागाई रोखण्यासाठी केली जाणारी व्याजदर वाढ यामुळे कच्च्या तेलाची बाजारपेठ ढवळून निघाली आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिका, युरोप आणि चीन या तीन बड्या अर्थव्यवस्थांना वर्ष 2023 मध्ये मंदीचा फटका बसेल, असा अंदाज वर्तवला होता. त्यापार्श्वभूमीवर कच्चे तेल उत्पादक देश भविष्यातील ऑइल डिमांडबाबत सावध झाले आहेत.