Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

MG Motor मध्ये हिस्सेदारी घेण्यास रिलायन्ससह अनेक भारतीय कंपन्या उत्सुक

MG Motor

Image Source : www.cartrade.com

चीन-भारत संबंध सीमावादामुळे बिघडले आहेत. त्यामुळे चिनी MG Motor कंपनीला भारतामध्ये निधी उभारण्यात अडचणी येत आहेत. कंपनीने आता भारतीय उद्योगाला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्ससह अनेक बड्या कंपन्यांसोबत बोलणी सुरू आहे. पाच हजार कोटी उभारून कंपनीला भारतात उद्योगाचा विस्तार करायचा आहे.

MG Motor ही वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मुळची ब्रिटनमधील ही कंपनी SAIC Motor या कंपनीने विकत घेतली आहे. भारतीय रस्त्यांवर MG hector, MG Gloster गाड्या मोठ्या प्रमाणावर दिसतात. भारतामध्ये पाय रोवण्यास एमजी मोटर्स उत्सुक आहे. मात्र, निधी उभारण्यात कंपनीला अडचणी येत असल्याने स्थानिक उद्योगांना हिस्सा विकण्याचे प्रयत्न कंपनीकडून सुरू आहे.

कोणत्या भारतीय कंपन्यांसोबत बोलणी सुरू

रिलायन्स इंडस्ट्रीज, हिरो ग्रुप, जेएसडब्लू ग्रूप, प्रेमजी इनवेस्ट या कंपन्यांशी MG Motors ची बोलणी सुरू आहे. जास्तीत जास्त हिस्सेदारी भारतीय कंपनीला विकण्यास MG Motors आग्रही आहे. कारण, चिनी कंपनी असल्यामुळे भारतीय बाजारपेठ काबीज करण्यात अडचणी येत आहेत.

चीन-भारत संबंध कंपनीसाठी ठरतोय अडथळा

मागील काही वर्षांपासून भारत-चीन सीमेवर तणाव असल्याने चिनी कंपन्यांच्या भारतातील गुंतवणुकीला विरोध होत आहे. तसेच सरकारी धोरणेही चिनी कंपन्यांच्या विरोधात आहेत. अशा परिस्थितीत भारतामध्ये व्यवसाय वाढवणे एमजी कंपनीला कठीण जात आहे. त्यामुळे भारतीय कंपनीलाच सोबत घेऊन प्रगती करण्याचा विचार एमजी मोटर्स करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

भारतीय कंपन्यांसोबतची बोलणी शेवटच्या टप्प्यात असून या वर्षाच्या शेवटपर्यंत डील होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये व्यवसाय वृद्धी करण्यासाठी कंपनीला निधीची अत्यंत गरज आहे. भारतातील मोठ्या कंपनीसोबत जाण्यास एमजी मोटर्स प्रयत्न करत आहे. जी कंपनी चांगल्या मुल्यांकनावर सोबत येईल तिला प्राधान्य मिळू शकते.

पेरंट कंपनी SAIC Motor कडून निधी मिळण्यास अडचण 

SAIC Motor या बलाढ्य चिनी कंपनीची एमजी मोटर्स ही उपकंपनी आहे. या कंपनीकडून निधी मिळण्यात अडचणी आहेत. भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी SAIC Motor कडून निधी मिळवण्याचे प्रयत्न मागील दोन वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यास सरकारी मान्यता मिळाली नाही. चिनी कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करू देण्यास सरकारीही तयार नाही. त्यामुळे निधी उभारण्यासाठी भारतीय कंपनीसोबत जाण्याचा निर्णय एमजी मोटर्स कंपनीने घेतला आहे.

एमजी मोटर्स कंपनीचे भारतीयीकरण करण्यावर भर

भविष्यात एमजी मोटर्स ही कंपनी चिनी नाही तर भारतीयच वाटावी असा प्रयत्न कंपनीचा आहे. “Indianise operation” करण्यावर कंपनीचा भर आहे. त्यामुळे कंपनीची हिस्सेदारीही भारतीय कंपनीला विकण्याचा प्रयत्न आहे. सोबतच देशातील हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल म्हणजे अती श्रीमंत व्यक्तींची गुंतवणूक कशी आणता येईल यासाठी एमजी मोटर्स प्रयत्नशील आहे.

पाच हजार कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न

भारतामध्ये पुरवठा साखळी, निर्मिती प्रकल्प आणि इतर सुविधा उभारण्यासाठी कंपनीला 5 हजार कोटींची गरज आहे. गुजरातमधील हलोल येथे MG Motors कंपनीचा निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प कंपनीने जनरल मोटर्स कंपनीकडून विकत घेतला आहे. जनरल मोटर्स कंपनीने भारतातून काढता पाय घेतल्याने हा प्रकल्प एमजी मोटर्स कंपनीने घेतला. या प्लांटमधून वर्षाला 1 लाख 20 हजार गाड्या तयार होतात.

हलोल येथे आणखी एक प्लांट उभारून निर्मिती क्षमता 3 लाखांवर नेण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. भारतामध्ये येत्या काळात आणखी चार ते पाच नव्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा मानस कंपनीचा आहे. बॅटरी निर्मितीचा प्रकल्प उभारणीसाठीही कंपनी प्रयत्नशील आहे.