Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्ध सुरू होऊन शनिवारी (8 जुलै 2023) पाचशे दिवस पूर्ण झाले आहेत. दोन देशांमध्ये इतक्या दिवस युद्ध सुरू असल्याचे कदाचित ही पहिलीच घटना असेल. जग एकमेकांच्या खूप जवळ आलं आहे, असे म्हणतात. पृथ्वीवरील एखाद्या कोपऱ्यातील घटनाही स्थानिक बाजारावर परिणाम करून जाते. रशिया-युक्रेन युद्धाचे आर्थिक-सामाजिक परिणाम संपूर्ण जगावर झाले. अद्यापही या धक्क्यातून जग सावरले नाही. पाहूया रशिया-युक्रेन युद्धामुळे जगावर काय परिणाम झाले.
युरोप-अमेरिकेसह जगभरात महागाईत वाढ
रशिया हा प्रामुख्याने युरोपियन देशांना इंधन पुरवठा करतो. मात्र, दोन्ही देशांत युद्ध सुरू झाल्यानंतर युरोपाला होणारा इंधन पुरवठा विस्कळीत झाला. जर्मनी, ब्रिटन, फ्रान्ससह युरोपातील प्रमुख देशांना रशियाकडून होणार इंधनपुरवठा थांबला. (500 days of Russia Ukraine War) त्यामुळे युरोपात महागाई वाढली. हिवाळ्यामध्ये युरोपात इंधनाची जास्त गरज असते. पुरवठा विस्कळीत झाल्याने इंधन दरवाढीचा संपूर्ण युरोपच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. अद्यापही या धक्क्यातून युरोपियन देश सावरले नाहीत.
अन्नधान्य पुरवठा साखळी विस्कळीत
युक्रेन जगभरात गहू, वनस्पती तेल, मका, बार्ली, सुर्यफूल तेल निर्यात करतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात थांबली. त्यामुळे कृषी उत्पादनाच्या किंमती वाढल्या. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा रोडावला. तसेच दरवाढही झाली. भारतातही खाद्यतेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. आता किंमती नियंत्रणात आल्या असल्या तरी भविष्यात युद्ध आणखी चिघळले तर कृषी उत्पादनांची दरवाढ होऊ शकते.
लाखो स्थलांतरित आणि कोट्यवधी डॉलर मालमत्तेचे नुकसान
रशिया-युक्रेन युद्धामुळे प्रभावित भागातील 60 लाखांपेक्षा जास्त नागरिक स्थलांतरित झाले. (economic impact of Russia Ukraine war) त्यांच्या उत्पन्नाचे साधन हिरावले गेले. शेती, उद्योग व्यवसाय, घर, मालमत्तेचे कोट्यवधींचे नुकसान झाले. संयुक्त राष्ट्राद्वारे उभारण्यात आलेल्या निवारागृहात त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या युद्धात 9 हजारांपेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला. युद्धामुळे 143 बिलियन डॉलर मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सर्वाधिक नुकसान कोणत्या गोष्टींचं झालं?
रशिया-युक्रेन युद्धात किती नुकसान झाले याची आकडेवारी किव स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सने जाहीर केली आहे. त्यानुसार घरांचे नुकसान 53 बिलियन डॉलर, पायाभूत सुविधा 36 बिलियन डॉलर, उद्योग-व्यवसाय 11 बिलियन डॉलर, शैक्षणिक संस्था 8 बिलियन डॉलर, शेती आणि उर्जा संसाधनांचे सुमारे 8 बिलियन डॉलरचे नुकसान झाले. सोबतच रस्ते, वाहतूक व्यवस्था, पर्यटन, आरोग्य, वने, व्यापार यांचेही मोठे नुकसान झाले.
संरक्षणावरील खर्चात वाढ
युरोप आणि अमेरिका युद्धामध्ये युक्रेनला मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. आतापर्यंत कोट्यवधींची आर्थिक मदत आणि शस्रास्त्रे युक्रेनला पुरवण्यात आली आहेत. शस्त्र निर्मिती करणाऱ्या कंपन्या यातून नफा कमावत आहेत. तर एकीकडे स्थलांतरितांची उपासमार सुरू आहे. युक्रेनमधील कोणत्याही भागात अचानक क्षेपणास्त्राचा मारा होऊन जीव जात आहेत. तसेच मालमत्तेचे नुकसानही होत आहे.