Inflation in India: घरगुती खर्च, आरोग्य आणि शिक्षणावरील वाढत्या खर्चाची भारतीयांना सर्वाधिक चिंता वाटत असल्याचे स्टेट बँक लाइफ इन्शुरन्सने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. घरगुती लागणाऱ्या वस्तुंच्या किमती दरदिवशी वाढत आहेत. अन्नपदार्थ आणि भाजीपाल्याच्या किंमतीही मागील काही दिवसांपूर्वी उच्चांकावर गेल्या होत्या. आता सणासुदीच्या तोंडावर पुन्हा महागाई वाढताना दिसून येत आहे.
41 शहरातील नागरिकांचा अभ्यासात समावेश
स्टेट बँक लाइफ इन्शुरन्स आणि डेलॉइट इंडिया रिसर्च कंपनीने मिळून हा अभ्यास केला. यात 41 शहरातील 5 हजार नागरिकांना महागाई आणि गुंतवणुकीबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यातील 43% नागरिकांनी वाढती महागाई हा सर्वात गंभीर प्रश्न असल्याचे म्हटले. Financial Immunity Study 2.0 असे या अभ्यासाचे नाव ठेवण्यात आले होते.
रुग्णालये, शिक्षणावरील खर्चाची चिंता
अभ्यासात सहभागी झालेल्या 36% नागरिकांनी आरोग्यावरील वाढत्या खर्चाची चिंता व्यक्त केली. तर 35 टक्के नागरिकांनी शिक्षण महाग होत असल्याचे मत नोंदवले. मंदी येऊन मोठी अडचण उभी राहू शकते असे 27% नागरिकांना वाटते. तर कामामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याचे 24% नागरिकांनी म्हटले. तर 19% नागरिकांनी अपुरा आरोग्य आणि जीवन विमा संरक्षण असल्याचे मान्य केले.
उत्पन्नातील 52% रक्कम भविष्याच्या तरतुदीसाठी
भविष्यातील आर्थिक आव्हाने पेलण्यासाठीही 52% नागरिक उत्पन्नातील हिस्सा विविध पर्यायांमध्ये गुंतवत असल्याचे दिसून आले. यापैकी 17% बचत, 16 टक्के संपत्ती निर्मितीसाठी (म्युच्युअल फंड, गुंतवणूक योजना), 11% जीवन विमा आणि 8% रक्कम आरोग्य विम्याच्या प्रिमियमसाठी खर्च करत आहेत.
म्युच्युअल फंड आणि इक्विटीमध्ये 49% नागरिक गुंतवणूक करतात. तर 41% नागरिक मूळ उत्पन्नाचा स्रोत सोडून आणखी काही मार्गाने पैसा कमावण्यावर भर देत आहेत. आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी 70% नागरिकांनी सक्षम असल्याचे म्हटले. टर्म इन्शुरन्सद्वारे जास्त संरक्षण मिळत असले तरी जीवन विमा संबंधीत बचत विमा योजनेत सर्वाधिक नागरिक बचत करत असल्याचे अभ्यासातून समोर आले.