निस्सान कार निर्मिती कंपनीची डिसेंबर महिन्यातील कार विक्री रोडावली आहे. कंपनीने डिसेंबर महिन्यात फक्त 2 हजार 20 गाड्यांची विक्री केली. मात्र, याआधी २०२१ साली डिसेंबर महिन्यात 3 हजार गाड्यांची विक्री केली होती.
कंपनीने निर्यात केलेल्या गाड्यांची संख्या वाढली आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात कंपनीने सुमारे सात हजार गाड्या निर्यात केल्या आहेत. या तुलनेत २०२१ साली डिसेंबर महिन्यात फक्त चार हजार गाड्या निर्यात केल्या होत्या. या आकडेवारीवरून असे दिसते की, देशांतर्गत बाजारात कंपनीच्या वाहनांची विक्री रोडावली आहे. मात्र, गाड्यांची निर्यात वाढली आहे. २०२१ च्या तुलनेत मागील वर्षी कंपनीने गाड्यांच्या निर्यातीत ७३ टक्के वाढ नोंदवली आहे.
२०२२ वर्षात कंपनीने एकूण ८ हजार ९९१ गाड्यांची विक्री केली. ही आकडेवारी २०२१ च्या तुलनेत १९ टक्क्यांनी जास्त आहे. गाड्यांच्या पुरवठ्याबाबत मागील वर्ष आव्हानात्मक होते. सणांच्या काळात नागरिकांचा प्रतिसादही चांगला होता. निस्सान मॅगनाईट कारला ग्राहकांची पसंती होती, असे निस्सान इंडियाचे प्रमुख राकेश श्रीवास्तव यांनी म्हटले.
कंपनीने मागील काही दिवसांत प्रिमियम SUV गाड्या बाजारात आणल्या आहेत. X-Trail, Qashqai आणि Juke या गाड्या कंपनीने बाजारात आणल्या आहेत. निस्सान मॅगनाईट या गाडीला सर्वात जास्त पसंती मिळत आहे. सहा लाखांपासून पुढे निस्सानच्या SUV भारतीय बाजारात उपलब्ध आहेत.