आर्थिक नियोजनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा हा निवृत्तीनंतरचे आयुष्य आरामात जगता यावे यासाठी केलेली बचत. लोक 30-40 वर्ष काम करतात, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर आनंदात आयुष्यात घालवता यावे. त्यामुळे निवृत्तीनंतरचे आर्थिक नियोजन हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे असते. मात्र, महिलांसाठी निवृत्तीनंतरचे विशेषता उतार वयातील आर्थिक नियोजन हे खूपच महत्त्वाचे आहे.
महिलांना करिअरमध्ये तुलनेने मिळणाऱ्या कमी संधी, मुलं-वृद्ध पालकांना सांभाळण्यासाठी नोकरी न करणे, पुरुषांच्या तुलनेत मिळणारे कमी वेतन अशा विविध घटकांमुळे स्त्रियांनी आधीपासूनच बचत करणे गरजेचे आहे. ज्यामुळे वयाची 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर कोणतीही आर्थिक समस्या येणार नाही. तसेच, आर्थिक खर्चांसाठी मुलं व पतीवर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.
महिला निवृत्तीनंतरचे आयुष्यात आनंदात जगण्यासाठी कशाप्रकारे आर्थिक नियोजन करू शकतात, याविषयी जाणून घेऊया.
Table of contents [Show]
आतापासूनच सुरू करा बचत
भारतात घर सांभाळण्याची जबाबदारी प्रामुख्याने महिलांवर असली तरी घरातील खर्चांसाठी पुरुषांच्या पगारावर अवलंबून राहावे लागते. नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढत चालली असली तरीही पैशांचे अधिकार हे पुरुषांकडेच असल्याचे पाहायला मिळते. मात्र, यामुळे घटस्फोटित अथवा सिंगल पॅरेंट महिलांना निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
वृद्धापकाळात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. पगारातील ठराविक रक्कम दरमहिन्याला बाजूला काढून ठेवल्यास भविष्यात नक्कीच फायदा होईल. तसेच, जेवढ्या लवकर बचत सुरू कराल, तेवढी अधिक रक्कम निवृत्तीच्यावेळी तुमच्याकडे असेल.
स्वतःच्या नावाने बचत खाते उघडा
बहुतांश महिलांचे स्वतःच्या नावाने बँक खाते नसल्याचे पाहायला मिळते. महिला प्रामुख्याने घरातच पैसे ठेवतात अथवा पतीच्या बँक खात्यात जमा करतात. मात्र, असे न करता स्वतःच्या नावाने बचत खाते उघडल्यास फायदा होऊ शकता. स्वतःचे बँक खाते असल्यास तुम्ही नियमितपणे यात पैसे जमा करू शकता व गरजेनुसार पैसा काढू देखील शकता. यामुळे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही. बचत खात्यात जमा केलेले पैसेच भविष्यात तुमचा आधार ठरतील.
गुंतवणूक करा
गुंतवणूक ही निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. वृद्धापकाळात हीच गुंतवणूक फायद्याची ठरत असते. अनेक महिला सोन्याचे दागिने खरेदी करतात. जोखीम स्विकारायची नसल्यास सोन्यात गुंतवणूक करणे चांगला पर्याय आहे. मात्र, यातून तुम्हाला जास्त परतावा मिळत नाही. सोन्याव्यतिरिक्त मालमत्ता, स्टॉक्स, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. दीर्घकालीन उद्देशाने यात गुंतवणूक केल्यास वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमच्या हातात मोठी रक्कम असेल.
विमा काढणे गरजेचे
पुरुषाच्या तुलनेत महिला जास्त वर्ष जगतात. याचाच अर्थ वृद्धापकाळात महिलांचा वैद्यकीय खर्च देखील जास्त असतो. त्यामुळे जीवन विमा, आरोग्य विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. विमा काढलेला नसल्यास संपूर्ण बचत ही हॉस्पिटलचे बिल्स भरण्यातच संपते. त्यामुळे निवृत्तीनंतर आरामात आयुष्य जगण्यासाठी गुंतवणुकीसोबतच जीवन विमा काढणे देखील अत्यंत गरजेचे आहे.