भारतात घरभाडे किंवा भाड्यातून मिळणारे उत्पन्न भारतीय आयकर कायद्याच्या कक्षेत येते. जर तुमची एखादी मालमत्ता आहे आणि ती भाड्याने दिली आहे. भाड्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे योग्यप्रकारे नियोजन केले नाही तर तुमच्या भाड्यातील उत्पन्नाचा मोठा भाग टॅक्समध्ये जाऊ शकतो. कर कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या कपातीचा फायदा घेऊन कराचा बोजा कमी करता येऊ शकतो. एक गुंतवणूकदार आणि घरमालक म्हणून तुमच्या उत्पन्नामध्ये अधिकाधिक वाढ करणाऱ्या कर फायद्यांची तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
भारतीय आयकर कायदा, 1961 अंतर्गत घर भाड्याने देणाऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करांचे फायदे पाहण्यापूर्वी भारतात भाड्याच्या उत्पन्नावर टॅक्स कशाप्रकारे आकारला जातो, हे समजून घेऊ.
भाड्याच्या उत्पन्नावर कर दायित्व
भाड्याच्या उत्पन्नावर वैयक्तिक व्यक्तीच्या इन्कम टॅक्स स्लॅबनुसार टॅक्स आकारला जातो. एखाद्या व्यक्तीकडे इतर कोणतेही उत्पन्न नाही आणि त्याला भाड्यातून एका वर्षात 2.5 लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न मिळत असेल तर त्याच्यावर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही. कारण भारतीय कर कायद्यानुसार त्याचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे. पण पुढच्या वर्षात त्या भाड्याच्या उत्पन्नात 20 टक्क्यांनी वाढ झाली तर काय? मग त्यावर टॅक्स आकारला जाणार का? अशावेळी भाड्याच्या उत्पन्नावर असलेल्या काही कर सवलतींमुळे कदाचित त्या वर्षांतही त्याच्यावर टॅक्स आकारला जाणार नाही. घर भाड्याने देणाऱ्या मालकांसाठी कोणकोणत्या टॅक्स सवलती आहेत, हे आता पाहुया.
भाड्याच्या उत्पन्नावर मानक वजावट उपलब्ध
दुरुस्ती आणि देखभालीसाठी मालमत्तेच्या एकूण मूल्याच्या 30 टक्के प्रमाणावर मानक वजावट (Standard deduction) असते. यात महापालिकेकडून आकारला जाणार टॅक्स वजा केल्यानंतर ही रक्कम मोजली जाते. तुमचा हा खर्च प्रत्यक्षात कमी किंवा जास्त असला तरीही 30 टक्के कपातीची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर, तुम्ही त्या आर्थिक वर्षात महापालिकेला टॅक्स भरत असाल तर तुम्ही तो ही वजा करू शकता.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला भाड्याच्या उत्पन्नातून 3.2 लाख रुपये मिळतात. त्यातून त्याने महापालिकेचा 20 हजार रूपयांचा टॅक्स भरला. म्हणजे त्याचे निव्वळ उत्पन्न 3 लाख रूपये राहिले. त्यावर 30 टक्के मानक वजावट लागू झाल्यास त्यातून 90 हजार रूपये वगळ्यास त्याचे एकूण उत्पन्न 2.10 लाख रूपये राहील. जे करपात्र उत्पन्नापेक्षा (2.5 लाखापेक्षा) कमी आहे. अनिवासी भारतीय (NRI) देखील घर आणि मालमत्तेच्या उत्पन्नावर मानक वजावट दावा करू शकतात.
गृह कर्जावर कर लाभ
गृह कर्जावर (Home Loan) तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी करून ती भाड्याने दिली असेल तर गृह कर्जावर भरलेल्या व्याजावर कर कपातीचा दावा (Tax benefit against Home loan) करू शकता. कर कायद्याच्या कलम 24 (b) अंतर्गत घरमालक गृह कर्जावर भरलेल्या व्याजावर 2 लाखांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकतो. त्याचबरोबर ती व्यक्ती कलम 80EEA अंतर्गत कर लाभासाठी पात्र ठरली तर त्याला 1.5 लाखापर्यंतच्या कर सवलतीवरही दावा करता येऊ शकतो. थोडक्यात घर खरेदी केलेल्या मालमत्तेतून भाड्याने उत्पन्न मिळत असले तरी, कर्ज भरत असलेल्या रकमेच्या व्याजावर तुम्हाला 3.5 लाख रुपयांपर्यंतची वजावट मिळू शकते.
मालमत्तेतील भागीदारांसाठी कर लाभ
भागीदारीमध्ये एखादी मालमत्ता खरेदी केली असेल तर त्या मालमत्तेतून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नावरील कर दायित्व कमी होऊ शकते. कन्व्हेयन्स डीडमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, मालमत्तेतील सर्व सह-मालक (Property Co-owners), भागीदार, त्यांच्या मालकीच्या प्रमाणानुसार कर लाभाचा दावा करू शकतात. त्यामुळे मालमत्तील प्रत्येक भागीदार कलम 24 आणि 80EEA अंतर्गत कर लाभाचा दावा करू शकतो. मालमत्तेतील भागीदारंनी दावा केलेली एकूण कर वजावटीची रक्कम ही त्या आर्थिक वर्षातील गृहकर्जावरील व्याजापेक्षा जास्त नसायला हवी.