फ्रेंच वाहन निर्मिती कंपनी रेनॉल्टने 2023 वर्षात सर्व श्रेणीतील वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. जानेवारी 2023 पासून नव्या किंमती लागू होतील. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती, पुरवठा साखळीचा अतिरिक्त खर्च, महागाई आणि आंतरराष्ट्रीय चलनातील अस्थिरता या कारणांमुळे किंमत वाढ करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. सरकारी नियम आणि अटींचे पालन हाही किंमत वाढ करण्यामागील कारण असल्याचे कंपनीने सांगितले.
Table of contents [Show]
भारतात व्यवसाय वृद्धीसाठी कंपनीचे प्रयत्न
2005 साली कंपनीने मंहिद्रासोबत पार्टनरशीप करत लोगान ही कार बाजारात आणली होती. त्यानंतर 2011 साली कंपनीने स्वतंत्र कार भारतीय बाजारपेठेत आणण्यास सुरुवात केली. भारतामध्ये पाय रोवण्यासाठी मागील काही वर्षांपासून रेनॉल्ट इंडिया प्रयत्न करत आहे. अत्याधुनिक वाहन निर्मिती प्रकल्प, दोन जागतिक दर्जाचे टेक्नॉलॉजी डिझाइन सेंटर, 500 शोरुम्स आणि तेवढेच सर्व्हिस सेंटर्स उभारण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. रेनॉल्ट ब्रँड भारतामध्ये यशस्वी करण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कंपनीकडून 'प्राईज ऑफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी' वापरत आहे.
सर्वात प्रसिद्ध मॉडेल्स कोणती?
रेनॉल्ट क्विडची (Renault Kwid price) भारतातील किंमत सुमारे 4.64 लाखांपासून पुढे सुरू होते. तर रेनॉल्ट किगरची आणि रेनॉल्ट ट्रायबरच्या किंमत 6 लाखांपासून पुढे आहेत. टॉप मॉडेच्या किंमतींमध्ये फिचर्सनुसार किंमत जास्त आहे. आत्तापर्यंत कंपनीने भारतात 8 लाखांपेक्षा जास्त कार विक्री केल्या आहेत. कंपनीने वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी क्विड हॅचबॅग, ट्रायबर MPV, कायगर SUV गाड्यांच्या खरेदीवर डिस्काऊंट दिला जात आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी ऑफरही सुरू करण्यात आल्या आहेत.
इतर कंपन्यांनीही वाढवल्या किंमती
मर्सडीज बेंझ, ऑडी, एमजी मोटार, किया इंडिया या कंपन्यांनीही जानेवारीपासून वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझीकीने पुढील वर्षी जानेवारीमध्ये किंमतीत वाढ करणार असल्याचे मागील आठवड्यात जाहीर केले आहे. मात्र, किती वाढ करण्यात येईल याचा खुलासा सुझीकीने केला नाही. टाटा मोटर्सनेही नेक्सॉन कारच्या किंमतीत 18 हजार रुपयांची वाढ केली आहे.
पुढील वर्षीपासून BS-6 लागू होणार
पुढील वर्षात बीएस -6 वायू उत्सर्जन मानदंडाच्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार असल्याने वाहन निर्मितीसाठी लागणारा खर्च वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑडी इंडियाने सर्व प्रकारातील वाहनांच्या किमती 1.7% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर मर्सडीज बेंझने सर्व प्रकारच्या वाहनांच्या किमतीत 5% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमजी मोटर्सने विविध श्रेणीतील वाहनांवर 2 ते 3 % वाढ करण्याचा मानस व्यक्त केला आहे.