देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आणखी 5 वर्ष रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) अध्यक्ष पदावर कायम राहण्याची शक्यता आहे. अंबानी यांची 2029 पर्यंत कंपनीच्या अध्यक्षपदासह व्यवस्थापकीय संचालक म्हणून 2029 कायम राहण्यासाठी कंपनीने भागधारकांकडे परवानगी मागितली आहे. तसेच अंबानी यांनी यापुढील काळातही एक रुपया देखील वेतन न घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
2002 पासून अध्यक्ष
रिलायन्स इंडिस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून अंबानी हे 2002 पासून कंपनीचे धुरा सांभाळत आहेत. दर 5 वर्षांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) पदाची नियुक्ती केली जाते. दरम्यान, 21 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाने 19 एप्रिल 2024 ते जुलै 2029 या कालावधीसाठी अंबानी यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्ती केली आहे.
भागधारकांकडे विनंती
रिलायन्सच्या संचालक मंडळाने कंपनीच्या हितासाठी पुढील काळातही अंबानी यांनी कंपनीचे नेतृत्व करायला हवे असे मत व्यक्त केले आहे. मात्र, मुकेश अंबानी यांचे वय सध्या 66 वर्षे इतके आहे. तसेच 19 एप्रिल 2027 रोजी ते वयाची 70 वर्षे पूर्ण करतील. परंतु कंपनी कायद्यानुसार कंपनीच्या अध्यक्ष पदासाठी 70 वयापेक्षा जास्त कालावधी ग्राह्य धरला जात नाही. त्यामुळे त्यासाठी विशेष ठराव करत अंबानी यांना आणखी 5 वर्षांचा कार्यकाळ देण्यासाठी भागधारकांची परवानगी मागितली आहे.
शून्य वेतनावर करणार काम-
मागील 3 वर्षापासून अंबानी हे कंपनीकडून वेतन स्वीकारत नाहीत. त्याच प्रमाणे पुढील 5 वर्षाच्या कालावधीसाठी मुकेश अंबानी यांनी कोणतेही वेतन अथवा नफ्याच्या माध्यमातून कमिशन स्वीकारण्यासही नकार दिला आहे. दरम्यान, रिलायन्स कंपनी अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षा पुरविण्याची व्यवस्था करणार असल्याचेही कंपनीने केलेल्या ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे.