रिलायन्स जिओ सिनेमा अॅपवर इंडियन प्रिमियर लीगचे (IPL matches Free on JioCinema) सामने मोफत पाहायला मिळत आहेत. रिलायन्सने आपल्या ऑनलाइन कंटेट प्लॅटफॉर्मचे प्रमोशन करण्यासाठी कदाचित हा निर्णय घेतला असावा. मात्र, IPL संपल्यानंतर जिओ सिनेमा पाहण्यासाठी शुल्क भरावे लागणार आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन, झी 5 या सारख्या तगड्या प्रतिस्पर्धींशी जिओ सिनेमाची स्पर्धा होणार आहे. रिलायन्सने जिओ मोबाईल सेवा लाँच केली तेव्हाही सुरुवातीचे काही महिने मोफत इंटरनेट ग्राहकांना देऊ केले होते. मात्र, ग्राहक जिओकडे वळवल्यानंतर शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती.
OTT प्लॅटफॉर्म्समधील तीव्र स्पर्धा
ऑनलाइन कंटेट क्रिएशन आणि डिस्ट्रिब्युशन चॅनल्समध्ये मागील काही वर्षात स्पर्धा वाढली आहे. कोरोना काळात तर थिएटर्स बंद असल्याने OTT कंकेटला डिमांड आली होती. अनेक चित्रपटही OTT वर प्रदर्शित झाले. आता जिओ सिनेमाही ग्राहकांसाठी चित्रपट, मालिका आणि वेब सिरिज घेऊन येईल. हिंदी, इंग्रजी सोडता स्थानिक भाषांमध्येही ओटीटी प्लॅटफॉर्म्स उभे राहत आहेत. या रिजनल अॅप्सला प्रतिसादही मिळत आहे.
जिओ सिनेमा सब्सक्रिप्शन सुरू करणार
जिओ सिनेमा हे रिलायन्सच्या Viacom18 कंपनी अंतर्गत येते. जिओ सिनेमावर लवकरच 100 पेक्षा जास्त सिनेमे आणि सिरियल्स पाहायला मिळणार आहेत. मात्र, यासाठीचा खर्च सबस्क्रिप्शनमधून जमा केला जाईल. सध्या जिओने IPL मोफत पाहण्याची सुविधा भारतीयांना उपलब्ध करून दिली आहे. जिओ सिनेमा अॅपची दर्शकांना ओळख व्हावी; हा मार्केटिंग फंडा यामागे होता. रिलायन्स मीडिया आणि कंटेट व्यवसाय प्रमुख ज्योती देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी ब्लुमबर्ग या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी जिओ सिनेमाचे पेड व्हर्जन सुरू करणार असल्याचे सांगितले.
स्वदेशी कंटेटला प्राधान्य
28 मे ला IPL चे सामने संपतील. त्यापूर्वीच जिओवर आणखी कंटेट अपलोड करण्यात येईल. मात्र, त्यानंतर जिओ सिनेमा अॅपचा अॅक्सेस मिळवायचा असेल तर पैसे मोजावे लागतील. ब्लूमबर्गशी मुलाखतीत बोलताना ज्योती देशपांडे म्हणाल्या की, “सध्या जी काही OTT अॅप्स भारतात आहेत, त्यावरील कंटेट हा पाश्चिमात्य धाटणीचा आहे. जिओ सिनेमा स्थानिक कौशल्यगुणांना वाव देईल, तसेच जास्तीत जास्त भारतीय कंकेट आणि कलाकारांना प्राधान्य देईल”.
कोरोनानंतर OTT प्लॅटफॉर्म्सचा नफा रोडावला
कोरोनानंतर सर्व काही सुरळीत झाल्यानंतर OTT इंडस्ट्रीचा व्यवसायही रोडावला आहे. लॉकडाऊनमध्ये नागरिक घरातून ऑनलाइन कंटेट पाहत होते. मात्र, आता थिएटर्स, मालिकांचे चित्रिकरण सर्वकाही सुरळीत झाल्याने OTT अॅप्सचे ग्राहक कमी झाले आहेत. तसेच स्पर्धाही वाढली. त्यात आता जिओ सिनेमाने उडी घेतली आहे. भारतीय ग्राहक किंमतीच्या बाबतीत संवेदशील असल्याचे विचार घेऊन त्यानुसार दर ठरवण्यात येतील, असे रिलायन्सने म्हटले आहे. सध्या IPL मुळे जिओ सिनेमाला दरदिवशी लाखो दर्शक मिळत आहेत.