रिलायन्सने 5G नेटवर्कमध्ये प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्यांना मागे सारस बाजी मारली आहे भारतातील १०१ शहरांमध्ये Jio 5G नेटवर्क सुरू केल्याची माहिती कंपनीने दिली. तामिळनाडू आणि उत्तराखंड राज्यामधील काही शहरांमध्ये रिलायन्सने नुकतीच 5G सेवा सुरू केली आहे. 5G नेटवर्कच्या स्पर्धेत कंपनीने एअरटेल कंपनीला मागे सारले आहे. भारतामध्ये 4G सेवा सुरू करून रिलायन्सने डिजिटल क्रांती घडवून आणली. इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांचा व्यवसाय जिओने स्वत:कडे खेचून घेतला आहे.
डेहराडून, कोइम्बतूर, तिरुचिरापल्ली, सेलम, होसूर, वेल्लोर, मदुराई या शहरांमध्ये कंपनीने नव्यानेच 5 G फास्ट इंटरनेट सुविधा सुरू केली आहे. एअरटेलची 5G सेवा 18 शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. आणखी 30 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार असल्याचे एअरटेलने जाहीर केले आहे. मात्र, जिओच्या तुलनेत एअरटेल 5G नेटवर्क कमी शहरांमध्ये पसरले आहे. वोडाफोन-आयडीया कंपनीने अद्याप 5G सेवा ग्राहकांसाठी सुरू केली नाही.
मार्च 2024 पर्यंत देशातील सुमारे 10 ते 15 कोटी ग्राहक ताब्यात घेण्यासाठी जिओ आणि एअरटेल कंपनीमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. एअरटेल कंपनीने अद्याप 5G मोबाईल इंटरनेच प्लॅनची किंमत किती असेल याबाबत निर्णय घेतला नाही. 4G सेवा वापरणारे ग्राहक 5G सेवेमध्ये अपग्रेड होऊ शकतात, असे कंपनीने म्हटले आहे. जिओने नुकतेच मोबाईलसाठी 5G चे प्लॅन लाँच केले आहेत.
सुरुवातीला जिओ 4G च्या दरामध्ये 5G चे रिचार्ज ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देणार आहे. मागील आठवड्यात कंपनीने वेगळे 5G पॅक जाहीर केले आहे. 119,149,179,199,209 रुपयांमध्ये 5G चे डेटा पॅक ग्राहकांना मिळतील. जिओने 4G सुविधा भारतात लाँच केल्यानंतर ग्राहकांना मोठी ऑफर दिली होती. अनेक दिवस फ्री इंटरनेट दिल्यानंतर कंपनीने रिचार्जची किंमत वाढवण्यास सुरुवात केली होती. आता 5G इंटरनेटसाठीही कंपनी तीच स्ट्रॅटेजी वापरत आहे.