साबण, तेल, औषधांपासून ते भाजीपाला आणि डेअरी अशा ग्राहकांना लागणाऱ्या विविध वस्तुंचे मार्केट म्हणजेच FMCG मध्ये रिलायन्स ग्रुप येत्या काळात दमदार एंट्री करणार आहे. ग्राहकांना दररोज वापरामध्ये लागणाऱ्या जवळजवळ सर्वच वस्तूंच्या कॅटेगरीमध्ये रिलायन्स येत्या काळात प्रवेश करणार आहे. सोबत, कच्च्या मालाची निर्मिती, पुरवठा साखळी सुधारण्यामध्येही रिलायन्स काम करणार आहे. यासाठी रिलायन्स ग्रुपने रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे.
कोणत्या सेक्टरमध्ये रिलायन्स उतरणार
घरगुती लागणाऱ्या वस्तू, अन्नपदार्थ, औषधे, विविध पेये, शेतीतून निघणारी उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने, घरगुती उपकरणे, कच्चा माल, मांस, पोल्ट्री यासह इतर अनेक उद्योगांमध्ये रिलायन्स कंपनी उतरणार आहे. त्यासाठी कंपनीने नियोजन आखले आहे. कच्च्या मलाच्या पुरवठ्यासाठी रिलायन्स कंपनी शेती आणि शेती संबंधित क्षेत्रामध्येही गुंतवणूक करणार आहे.
रिलायन्सचे रिटेलचे काही ब्रँड्स एक्सक्लुझिव्हली रिटेल शॉपमध्येच विक्री करण्याची रणनीती बदलण्यात येणार आहे. कारण, रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्स कंपनीद्वारे सुद्धा विविध उत्पादनांची विक्री करण्यात येणार आहे. RCPL कंपनीवर रिलायन्स ग्रुपने चार संचालकांची नेमणूकही केली आहे. मागील वर्षीच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये एफएमसीजी उद्योगात उतरणार असल्याची घोषणा कंपनीने केली होती. त्यानुसार नव्या कंपनीचे रजिस्ट्रेशनही करण्यात आले आहे. रिलायन्स रिटेल उद्योगासोबतही नवा कन्झ्युमर उद्योग मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी सांभाळत आहेत.
रिलायन्स कन्झ्युमर प्रॉडक्स लिमिटेड कंपनीने मागील दहा दिवसांत दोन कंपन्यांमध्ये भागीदारी विकत घेण्याची घोषणा केली. लोटस चॉकलेट कंपनीत रिलायन्स कंपनी ५१ टक्के शेअर्स खरेदी करणार आहे. तर शीतपेय बनवणाऱ्या स्योसो हजोरी बेव्हिरेजेस कंपनीचे ५० टक्के शेअर्स खरेदी करणार आहे.