वेगाने वाढणारे ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI चा वापर यामुळे जगभरात मानवी नोकऱ्या कमी होत आहेत. खर्चात कपात करण्याच्या नावाखाली आणि मंदीच्या भीतीने तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी कपात होताना दिसत आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, विप्रो अशा नामांकित कंपन्यांनी देखील अशीच कारणे दाखवत हजारो कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. त्यानंतर विविध क्षेत्रातील लोक या कर्मचारी कपातीचा सर्वांगाने विचार करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ मानवांचीच जागा घेत नाही, तर एच.आर. एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कंपनीतील मानव संसाधन व्यवस्थापक देखील कृत्रिम बुद्धिमत्तेच वापर नोकर कपात करण्यासाठी करत आहेत.
एकेकाळी तंत्रज्ञान क्षेत्रात निर्णय घेणे सुलभ करण्यासाठी आणि वेगवान करण्यासाठी वापरले जाणारे एआय आता कमर्चारी कापतीच्या याद्या तयार करण्यासाठी वापरले जात आहे. खरे तर ही गोष्ट आश्चर्यकारक वाटू नये. आउटप्लेसमेंट कंपनी चॅलेंजर, ग्रे अँड ख्रिसमस यांच्या मते, गेल्या महिन्यात अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये सुमारे 42,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते, ही आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे.या सगळ्यात सर्वात जास्त फटका कुणाला बसला असेल तर तो भारतीय कर्मचाऱ्यांना!
गुगल, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, मेटा, अल्फाबेट आणि अमेझॉन सारख्या कंपन्यांमधील कर्मचारी कपातीमुळे अमेरिकेत कामासाठी गेलेल्या हजारो भारतीय आयटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. कामावरून काढून टाकल्यानंतर यूएसमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांना नवी नोकरी शोधावी लागणार आहे. यासाठी आता त्यांची धडपड सुरू आहे.याचे मुख्य कारण म्हणजे H-1B व्हिसा धारकांना कामावरून कमी केल्यास 60 दिवसांच्या आत नवी नोकरी शोधावी लागते. जर 60 दिवसात H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना नोकरी मिळाली नाही तर त्यांना अमेरिकेतून बाहेर पडावे लागते.इतक्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना लोकांना करावा लागतो आहे.
टेक रिसर्च फर्म गार्टनरची शाखा असलेल्या Captera च्या एका अहवालात असा दावा केला आहे की सर्वेक्षण केलेल्या 98% मानव संसाधन व्यवस्थापकांचा (Human Resource Executive) असा विश्वास आहे की 2023 मध्ये मंदी आली तर ते कर्मचारी खर्च कमी करण्यासाठी काही सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदमवर अवलंबून राहतील. रोजंदारी कामगारांचे अल्गोरिदमद्वारे व्यवस्थापन करणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही.म्हणजेच आता मशीनद्वारे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता तपासली जाणार आहे. कमर्चारी किती काम करतात, कसे काम करतात, कुठल्या पद्धतीने काम करतात या सगळ्यांचा विचार आता मशीनद्वारे म्हणजेच ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तपासले जाणार आहे.
2021 मध्ये, ब्लूमबर्ग न्यूजने वृत्त दिले होते की अमेझॉन त्याच्या फ्लेक्स डिलिव्हरी ड्रायव्हर्सचा (पार्सल पोहोचविण्याची सुविधा देणारे कर्मचारी) मागोवा घेत आहे. यामध्ये असे आढळले होते की,नियुक्त केलेल्या उद्दिष्टांची काही कर्मचारी पूर्तता करत नाहीये. याचा मागोवा मशीन अल्गोरिदमने घेतला होता आणि सदर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा ईमेल देखील ऑटोमेशन पद्धतीने कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला होता. म्हणजे काय, तर कामगारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आता मशीन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जात आहे. जगातील आघाडीच्या कंपन्या या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
प्रत्यक्षात कार्यालयाबाहेर जाऊन काम करणाऱ्या कामगारांवर ऑटोमेशन तंत्रज्ञानाने असा वचक ठेवणे कदाचित शक्य आहे, परंतु ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही पडताळणी थोडी अवघड आहे. कारण अनेकदा ऑफिसच्या कामांसाठीच मिटिंगला हजेरी लावणे, फोनवर बोलणे इत्यादी गोष्टी कर्मचाऱ्यांना कराव्या लागतात. अशावेळी मानव संसाधन व्यवस्थापकांची भूमिका महत्वाची ठरत असते.
#Microsoft and Alphabet became the latest companies to announce major job cuts last week. While Microsoft will reduce its global workforce by 10,000 people, #Google parent #Alphabet will cut 12,000 jobs in what is the largest #layoff in the company’s history. pic.twitter.com/Q68gGuksXO
— Statista (@StatistaCharts) January 30, 2023
असे असले तरी वर्कफोर्स प्रोडक्टिविटी स्कोरच्या (Workforce Productivity Score) वाढत्या लोकप्रियतेसह, कामगारांचे ट्रॅकिंग देखील शक्य होत आहे. आता तर AI कर्मचाऱ्यांच्या कीबोर्डच्या प्रत्येक स्ट्रोकवर आणि माउसच्या क्लिकवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय केले जात आहेत आणि त्यांच्या प्रोडक्टिविटीच्या म्हणजेच उत्पादकतेच्या आधारावर त्यांना कर्मचारी कपातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकतात.
Amazon चे ऑटोमेशन टूल बनले वादाचे शिकार
काही तज्ञांच्या मते, Amazon ने नोकरी अर्जदारांची क्रमवारी लावण्यासाठी एक स्वयंचलित टूल तयार केले होते. अमेझॉनकडे हजारोंच्या संख्येने नोकरीसाठी अर्ज येत असतात, त्याची क्रमवारी लावणे एच.आर. ला अवघड जात होते. यासाठी भूतकाळात नोकरीसाठी रेझ्युमे सबमिट केलेल्या लोकांचा जुना डेटा पाहण्यासाठी सिस्टमला प्रशिक्षण देण्यात आले होते. परंतु तंत्रज्ञान उद्योग पुरुषप्रधान असल्यामुळे आणि पूर्वी नोकरीसाठी अर्ज कलेले बहुतेक उमेदवार हे पुरुष होते,त्यामुळे ज्या महिलांनी नोकरीसाठी अर्ज केला होता त्यांना कंपनीच्या प्रतिसादासाठी खूप वाट पहावी लागली होती. मात्र, नंतर अमेझॉनने हे ऑटोमेशन टूल वापरणे बंद केले होते.
भारतात याचा काय परिणाम जाणवू शकतो?
तंत्रज्ञान आणि कामगार याबद्दल भारतात खूप चर्चा याआधी देखील झाली आहे आणि सध्या देखील होते आहे. भारतात संगणक आल्यानंतर लोकांनी जोरदार विरोध केला होता. संगणक आल्यामुळे लोकांचे रोजगार जातील अशी भीती नागरिकांना होती. औद्योगीकरणाच्या पहिल्या टप्प्यात असलेल्या भारतीयांना तशी भीती वाटणे रास्त देखील होते. परंतु कालांतराने तंत्रज्ञानाची अपरिहार्यता भारताने ओळखली आणि मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्रात रोजगार निर्मिती देखील झाली. जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे सावट असताना भारतात परिस्थिती अजूनही ठीकठाकच आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची विचार करण्याची शक्ती, चौकस बुद्धीमत्ता घेऊ शकत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. मशीनमध्ये प्रोग्राम मानवानेच भरले आहे, त्यामुळे मशीन मानवी कर्मचाऱ्यांची जागा घेऊ शकत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे.
मानवाने आजवर जे काही केले आहे तेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून मशीन करत आहे. परंतु भविष्यात काय करायचे आहे यावर केवळ मानवच विचार करू शकतात, मशीन विचार करूच शकत नाही असा देखील युक्तिवाद केला जात आहे. त्यामुळे भारतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फार तर आहे ते काम कमी करण्यासाठी, सुलभ करण्यासाठी होऊ शकतो परंतु त्यामुळे लोकांच्या नोकऱ्या जातील असे वाटत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.असे असले तरी, तंत्रज्ञानाचा मानवाला फायदा होतो कि तोटा होतो हे येणारा काळच सांगणार आहे.