Del Layoff: जागतिक पातळीवरील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची निर्मिती करणारी नामांकित डेल टेक्नॉलॉजी (Dell Technology) कंपनीने आपल्या जगभरातील सर्व ऑफिसेसमधून 5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व देशातील कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के म्हणजे सुमारे 6500 कर्मचाऱ्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली. डेलचे सहाय्यक ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी कर्मचाऱ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कंपनीने यापूर्वीही अशा आर्थिक मंदीचा सामना केला आहे. त्यासाठी कंपनी तयार असून त्यावर आम्ही पुन्हा एकदा मात करून यातून बाहेर पडू. 2020 मध्ये कोविड-19 च्यावेळी अशाचप्रकारे कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती.
अमेरिकेतील सर्व नामांकित कंपन्यांकडून कर्मचारी कपात
अमेरिकेतील मायक्रोसॉफ्टपासून अॅमेझॉन, गोल्डमॅन सॅचसारख्या कंपन्यांनी आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले. काही दिवसांपूर्वीच मायक्रोसॉफ्ट कंपनीने 10 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय जाही केला होता. तर गुगलची मुख्य कंपनी अल्फाबेट कंपनीने 12 हजार कर्मचाऱ्यांना कमी केले. आयबीएम (IBM) कंपनीनेही काही दिवसांपूर्वी 3,900 कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली होती. कंपनीला चौथ्या तिमाहीत महसुलाचे लक्ष्य गाठता न आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला होता.
टेक कंपन्यांवर मंदीचे मळभ अधिक गडद
जर्मनीतील सॉफ्टवेअर कंपनी सॅप (SAP)नेही मागच्या आठवड्यात एकूण कर्मचाऱ्यांपैकी 3 हजार कर्मचारी कमी करणार असल्याचे म्हटले होते. अमेरिकेत गेल्या 2 वर्षांत कर्मचाऱ्यांची कपात एका उच्च स्तरावर पोहोचली आहे. याचा सर्वाधिक फटका टेक्नॉलॉजी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना बसला आहे. या कंपन्यांवर मंदीचे मळभ अधिक गडद आहे. त्यामुळेच या कंपन्या सर्वप्रथम आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या मागेल लागल्या आहेत.
मंदीच्या भीतीने जगभरातील कंपन्या मेटाकुटीला आल्या आहेत. यात टेक कंपन्यांना सर्वाधिक धास्ती असल्याचे दिसून येते. जगभरातील नामांकित कंपन्या मेटा (फेसबुक), गुगल, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर, अॅमेझॉन अशा मोठमोठ्या कंपन्यांनी आर्थिक मंदीची चाहूल लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांची कपात करून कंपन्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास सुरूवात केली.