मे 2022 पासून, रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली. 2.5 टक्क्यांनी वाढवून ती 6.5 टक्क्यांवर नेली. आरबीआयच्या या निर्णयाचा मुदत ठेवीच्या गुंतवणूकदारांना फायदा झाला आणि एफडीच्या गुंतवणूकदारांना बँकांकडून जवळपास 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू लागलं. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. यावेळी रिझर्व्ह बँक दरवाढीला स्थगिती देण्याची शक्यता वर्तवली जातेय. सध्यातरी सेंट्रल बँकेच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. काही बँकांनी मात्र एफडीवरच्या व्याजदरात कपात करण्यास सुरुवात केलीय.
Table of contents [Show]
पीएनबीनं कमी केले व्याज दर
सार्वजनिक क्षेत्रातली बँक पंजाब नॅशनल बँकेनं मुदत ठेवींवरच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा केलीय. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याच्या नुकत्याच घेतलेल्या निर्णयापेक्षा बँकांची तरलता चांगली असेल, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. परिणामी, ठेवींचा आधार सुधारण्यासाठी मुदत ठेवींवर व्याजदर वाढवण्याचा त्यांच्यावर दबाव कमी असणार आहे.
सध्याच्या व्याजाची स्थिती काय?
सार्वजनिक क्षेत्रातली बँक पंजाब नॅशनलनं 1 जून रोजी मुदत ठेवींवरचा व्याजदर कमी करण्याची घोषणा केलीय. बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, गुंतवणूकदाराला किमान 3.50 टक्के आणि कमाल 7.25 टक्के व्याज मिळतंय. 1 वर्षाच्या एफडीवरचा व्याजदर 6.80 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आलाय. ज्येष्ठ नागरिकांसाठीचा व्याजदरही 7.30 टक्क्यांवरून 7.25 टक्के करण्यात आलाय. सुपर सिनियर सिटीझनसाठी व्याजदर 7.60 टक्क्यांवरून 7.55 टक्के करण्यात आले आहेत.
इतर बँकांचे व्याजदर
सार्वजनिक क्षेत्रातली सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय सध्या आपल्या ग्राहकांना 7 टक्के व्याज देत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्क्यांची अतिरिक्त सुविधा मिळतेय. खासगी बँकांचा विचार केल्यास एचडीएफसी 15 ते 18 महिन्यांसाठी 7.10 टक्के तर दीर्घ मुदतीसाठी 7 टक्के, आयसीआयसीआय दोन वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी 7.1 टक्के, कोटक महिंद्रा दीर्घ मुदतीसाठी 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 0.5 टक्के, येस बँक तीन वर्षांपर्यंत 7.5 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. थोडक्यात केवळ पंजाब नॅशनल बँकच नाही तर इतर सर्वच मोठ्या बँका आपल्या एफडीवर सरासरी 7 टक्क्यांपर्यंतच व्याज देत आहेत.
स्मॉल फायनान्स बँकांचे व्याज दर जास्त
खासगी क्षेत्रातल्या लहान बँका एफडीवर जास्त व्याज देत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 5 वर्षांच्या एफडीवर जवळपास 9.10 टक्के व्याज देऊ करत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 9.60 टक्के दर ठेवण्यात आलाय. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना साधारण एक वर्षाच्या एफडीवर 8.25 टक्के व्याज देत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.75 टक्क्यांचा दर आहे. कालावधीनुसार या दरात फरक असणार आहे. इतरही काही छोट्या बँकांचे व्याजदर मोठ्या बँकांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना याचा विचार नक्कीच करावा.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)