Savings Account Balance Rules: बचत खात्यात किमान रक्कम नसल्यास बँक ग्राहकांकडून दंड वसूल करते. प्रत्येक महिन्यात सरासरी किती रक्कम असावी याचे नियम बँकेनुसार बदलतात. मात्र, शुल्क लागू करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने नियम जारी केलेले आहेत. अनेक वेळा या नियमांचे बँका उल्लंघन करतात. जागरुक नागरिक म्हणून तुम्हाला हे नियम माहिती असायला हवेत.
बॅलन्स मायनसमध्ये जाऊ शकतो का?
जर तुम्ही बचत खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर बँक दंड लागू करते. मात्र, जर झिरो बॅलन्स असेल तर खात्यातील बॅलन्स मायनस करू नये असे आरबीआयची नियमावली सांगते. (Savings Account Minimum balance RBI rules) खात्यातील किमान रक्कम कमी झाल्यास ग्राहकाला त्वरित मेसेज, मेल किंवा इतर मार्गाने सूचित करावे.
किमान बॅलन्स संबंधी RBI चे नियम काय?
खात्यात बॅलन्स नसल्याची सूचना दिल्यापासून 30 दिवसात किमान रक्कम जमा झाली नाही तर बँक दंड आकारू शकते. त्याआधीच दंड आकारू नये. दंड आकारण्याआधी कमीत कमी 30 दिवस थांबावे, असे RBI च्या नियमावली म्हटले आहे.
खात्यावर किती दंड आकारावा या संबंधीची पॉलिसी बँकेच्या संचालक मंडळाने मंजूर केलेली असावी.
जेवढा बॅलन्स कमी आहे तेवढ्याच प्रमाणात दंड आकारावा. (Savings Account Minimum balance rules) समजा 2 हजार रुपये किमान रक्कम खात्यात असायला हवी. मात्र, ग्राहकाच्या खात्यात फक्त 1 हजार रुपये होते. अशा वेळी उर्वरित 1 हजार रकमेवर दंड आकारला जावा.
दंडाची रक्कम माफक असावी, बँकेचा ग्राहकांना सेवा पुरवताना जेवढा खर्च होतो त्या प्रमाणात हे शुल्क असावे.
जर खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर ग्राहकाचा बॅलन्स मायनसमध्ये नेऊ नये. त्याऐवजी खात्यावर दिली जाणाऱ्या सुविधा कमी करता येऊ शकतात. जेव्हा खात्यात किमान रक्कम येईल तेव्हा या सुविधा पूर्ववत सूरू कराव्यात.
समजा तुमच्या खात्यात मागील काही दिवसांपासून किमान रक्कम नाही. त्यासाठी बँकेने 2 हजार रुपये दंड आकारला आहे. काही दिवसांनी तुम्ही खात्यात 10 हजार रुपये जमा केल्यास बँक प्रथम 2 हजार रुपये दंडाची रक्कम कापून घेईल.
प्रत्येक बँकेचे मिनिमन बॅलन्स मेंटेन करण्याचे नियम वेगवेगळे आहेत. बँक बचत खात्यावर किती शुल्क लागू करते. हे जाणून घेतल्यानंतर खाते उघडा. जी बँक कमीत कमी दंड आकारते अशा बँकेची निवड करू शकता.