केंद्र सरकारने अल्प बचतीच्या योजनांवरील व्याजदरात वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम रिझर्व्ह बँकेच्या बॉंडवर देखील झाला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बॉंडवरील (RBI Floting Rate Savings Bonds 2020) व्याजदर 7.35% इतका वाढला आहे. सुधारित व्याजदर 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.
यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बॉंडवर 7.15% इतके व्याज होते. मात्र अल्प बचतीच्या योजनानंतर बॉंडवरील व्याजदर 0.2% वाढला आहे. रिझर्व्ह बँक सेव्हिंग बॉंड्चा व्याजदर हा राष्ट्रीय बचत पत्राशी संलग्न आहे. राष्ट्रीय बचत पत्राच्या तुलनेत या बॉंडवर 0.35% जादा व्याज मिळते.
रिझर्व्ह बँकेने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार रिझर्व्ह बँकेच्या सेव्हिंग बॉंडचा कूपन रेट आता 7.35% इतका वाढला आहे. 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2023 या सहा महिन्यांसाठी आरबीआय सेव्हिंगमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना 7.35% व्याज मिळेल. जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत राष्ट्रीय बचत पत्रातवर 7% व्याजदर आहे.
रिझर्व्ह बँकेचे फ्लोटिंग रेट बॉंड्स 1 जुलै 2020 पासून गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. त्यावेळी आरबीआय सेव्हिंग बॉंडवरील कूपन रेट 7.15% जाहीर करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रीय बचत पत्रावरील व्याजदर 6.80% इतका होता. या बॉंडमध्ये किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक करता येते. बॉंडमधील गुंतवणूक कालावधी सात वर्षांचा आहे. वैयक्तिक गुंतवणूकदार आणि एचयूएफ अशा प्रकारात गुंतवणूक करता येऊ शकते. 60 वर्षांवरील ज्येष्ठ गुंतवणूकदारांना मुदतपूर्व गुंतवणूक काढून घेण्याची सुविधा आहे. या बॉंडमधील गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न करपात्र आहे. दरवर्षी 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी गुंतवणूकदारांना व्याज अदा केले जाते.