विदर्भातील नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात नागरिकांना अर्थसाक्षर करण्याचा विडा विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने (व्हीकेजीबी) उचलला आहे. मागील दोन वर्षात बँकेने 2400 हून अधिक खेड्यांमधील नागरिकांना वित्तीय साक्षरतेचे धडे दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या वित्तीय साक्षरता सप्ताह 2023 च्या निमित्ताने पुढील काही महिने 'व्हीकेजीबी' बँकेची तीन वाहने विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुर्गम तालुक्यांमध्ये जनजागृती करणार असल्याची माहिती 'व्हीकेजीबी'चे ऑडिट डिपार्टमेंटचे मॅनेजर धनंजय खण्डेरा यांनी 'महामनी'शी बोलताना दिली.
वित्तीय साक्षरतेची गरज ही खेड्यातील किंवा वंचित घटकालाच आहे, असे म्हणता येणार नाही. शहरातील सुशिक्षित लोकांची देखील आर्थिक फसवणूक होत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. उच्च शिक्षित लोक आमिषाला बळू पडतात आणि आर्थिक फसवणुकीचे शिकार होतात. त्यामुळे 'व्हीकेजीबी'चे म्हणणे आहे की प्रत्येकाला वित्तीय साक्षरतेची गरज आहे, असे खण्डेरा यांनी सांगितले. आर्थिक व्यवहारांबाबत लोकांना जागरुक करण्यासाठी वित्तीय साक्षरता हे एक मिशन म्हणून व्हीकेजीबी बँक काम करत आहे. एक वर्षात 40 हजार नागरिकांपर्यंत पोहोचण्यात बँक यशस्वी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
वित्तीय साक्षरतेसाठी 'व्हीकेजीबी'कडून तीन वाहनांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबवली जाते. यात एक गाडी अकोला आणि यवतमाळ रिजन, दुसरी गाडी रत्नागिरी आणि सोलापूर रिजन आणि तिसरी गाडी भंडारा-चंद्रपूर रिजनमध्ये वित्तीय समावेशनाबाबत खेडोपाडी जनजागृती करते असे त्यांनी सांगितले.
मागील दोन वर्षात वित्तीय साक्षरतेच्या बाबतील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने देश पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. चालू वर्षात 1000 हून अधिक फायनान्शिअल लिटरसीचे कॅम्प घेतले आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत जाणीव निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. वित्तीय साक्षरतेमुळे बँकांशी योग्य व्यवहार करणे, कर्जाची नियमित परतफेड करणे तसेच ती न केल्यास होणारे परिणाम याची जाणीव ग्राहकांना या कॅम्पमधून होते, असे त्यांनी सांगितले.
बँकेची 17 जिल्ह्यात वित्तीय साक्षरता केंद्र
'व्हीकेजीबी बँकेची 17 जिल्ह्यात वित्तीय साक्षरता केंद्र आहेत. या केंद्राच्या माध्यमातून त्या जिल्ह्यात मोहीम राबवली आहे. बँकेकडे कुशल मनुष्यबळ आहे. वित्तीय साक्षरतेवर चालू वर्षात एक हजारांहून अधिक कॅम्प आयोजित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. व्हीकेजीबी' बँकेकडे 9 लाख 10 हजारांहून अधिक प्रधानमंत्री जनधन खाती असल्याचे बँकेचे जनरल मॅनेजर अनिल कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले. विदर्भातील 11 , पश्चिम महाराष्ट्रातील 4 आणि कोकणातील 2 अशा एकूण 17 जिल्ह्यांमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचा विस्तार आहे. बँकेच्या 320 शाखांमधून व्यवसाय चालतो. बँकेची निमशहरी आणि ग्रामीण भागात चांगली पकड आहे. बँकेने मागील दोन वर्षात केंद्र सरकारच्या योजनांना गावोगावी पोहोचवल्या असून त्यातून चांगले परिणाम दिसून आले आहेत.
कोरोना काळात बँकेची डोअरस्टेप बँकिंग सुविधा
कोरोना काळात टाळेबंदीमुळे जनजीवन ठप्प होते. सर्व व्यवस्था बंद होती. बँकांना कामकाजासाठी मर्यादा होती. प्रत्येकाला बँकेच्या शाखेत सेवा देणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने खेडोपाडी जाऊन ग्राहकांना डोअरस्टेप बँकिंगची सुविधा दिली होती. टाळेबंदीमध्ये केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेतील खातेदारांना 500 रुपये पाठवण्यात आले होते. मात्र टाळेबंदीमुळे लाभार्थींना त्याचा लाभ मिळाला नाही. अशांना व्हीकेजीबी बँकेने घरी जाऊन तो आर्थिक लाभ दिला. यात बँकिंग प्रतिनिधींनी प्रत्येक लाभार्थीपर्यंत सरकारची मदत पोहोचवण्यात आले.