डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी बंगळुरूमधील हेल्थ ॲण्ड ग्लो (Health & Glow) ही कंपनी 750 कोटी रुपयांनी विकत घेतल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाईम्सने दिले आहे. राजन रहेजा आणि हेमेंद्र कोठारी यांच्याकडून ही कंपनी विकत घेतली आहे.
राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती 15 बिलिअन डॉलर (1,230 कोटी रुपये) इतकी आहे. दमानी यांनी यापू्र्वी 2015 मध्ये बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स विकत घेतले होते. ही देशातील सर्वांत जुनी किरकोळ विक्री करणारी चेन स्टोअर आहे. याची स्थापना स्वातंत्र्य सेनानी बाळ गंगाधर टिळक, मोहनदास रामजी आणि उद्योगपती जे आर डी टाटा यांनी 42 कोटी रुपयांमध्ये केली होती. त्यानंतर दमानी यांनी पुन्हा एकदा पर्सनल केअर प्रोडक्टची विक्री करणारी हेल्थ ॲण्ड ग्लो कंपनी विकत घेतली आहे.
हेल्थ ॲण्ड ग्लो या कंपनीची स्थापना 1997 मध्ये झाली होती. याचे पहिले स्टोअर 1997 मध्ये चेन्नई येथे ओपन झाले होते. त्यानंतर संपूर्ण भारतात याच्या 177 शाखा ओपन करण्यात आल्या. यामध्ये काही बंगळुरु, मंगळुरु, पुणे, मुंबई, कोचीन, कोलकाता, भोपाळ, भुवनेश्वर आणि हैदराबाद यासारख्या महानगरांचाही समावेश आहे. कंपनीने 2022 मध्ये 200 कोटींचा टप्पा गाठला होता. तर 2023 मध्ये तो 370 कोटीपर्यंत जाऊ शकतो.
सध्याच्या मार्केट रिसर्चनुसार भारतातील ब्युटी आणि पर्सनल केअर प्रोडक्टचे मार्केट हे 2023 पर्यंत साधारण 18.3 बिलिअन डॉलरपर्यंत जाऊ शकते. आता दमानींनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यामुळे यात आणखी मोठी उलाढाल होऊ शकते. सध्याच्या घडीला नायका सारखे ब्रॅण्ड या क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर झालेले आहेत. त्यामुळे भविष्यात या सेक्टरमध्ये कंपन्यांची स्पर्धा पाहायला मिळणार आहे.
Avenue Supermart म्हणजेच डी-मार्ट ही भारतातील सर्वांत मोठी फूड आणि ग्रोसरी विक्रीची चेन आहे. डी-मार्टने आपली सुरूवातीची 10 स्टोअर्स सुरू करण्यासाठी जवळपास 8 वर्षे घेतली होती. आता डी-मार्टची महाराष्ट्र, गुजरात, दमण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांमध्ये एकूण 327 कार्यरत स्टोअर्स आहेत.