PVR-INOX Theater: कोरोना काळानंतर भारतातील थिएटर व्यवसायाला घरघर लागल्याचे दिसून येत आहे. आयनॉक्स-पीव्हीआरने तोट्यातल्या 50 स्क्रीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सहा महिन्यात टप्प्याटप्प्याने हा निर्णय लागू होणार आहे.
कोरोकाळात भारतात ओटीटी आणि डिजिटल कंटेट निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागली. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. कोरोना साथ संपल्यानंतर थोडी प्रगती झाली मात्र, अद्यापही मनोरंजन व्यवसाय पूर्णपणे सुरळीत झाला नाही. आयनॉक्स पीव्हीआरने नुकतेच शेवटच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. त्यामध्ये थिएटर्स बंद करण्याच निर्णय घेतला.
मॉलमधील थिएटर स्क्रीन होणार बंद
आयनॉक्सचे मॉलमधील सर्वाधिक थिएटर स्क्रीन तोट्यात असून त्यामुळे कंपनीने पूर्णपणे या स्कीनच बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात पुन्हा नफ्यात येण्याची शक्यता कमी असल्याने व्यवस्थापनाने कायमचे थिएटर्स बंद करत असल्याचे म्हटले.
पीव्हीआर आणि आयनॉक्स या दोन्ही थिएटर कंपन्यांचे फेब्रुवारी 2023 मध्ये विलीनीकरण झाले आहे. देशभरातील 115 शहरांतील 361 थिएटर्समध्ये 1,689 स्क्रीन PVR INOX द्वारे चालवण्यात येतात. श्रीलंकेतही कंपनीचे काही थिएटर्स आहेत. 50 स्क्रीन बंद केल्याने कंपनीचे 10 कोटी रुपये वाचणार आहेत. जी थिएटर्स बंद करण्यात येणार आहेत ती प्रामुख्याने टायर 1 आणि टायर 2 शहरातील आहेत. दरम्यान, पुढील आर्थिक वर्षात PVR INOX देशभरात 150-175 स्क्रिन सुरू करणार आहे.
चौथ्या तिमाहीत 300 कोटींपेक्षा जास्त तोटा
आयनॉक्स-पीव्हीआर थिएटर्स कंपनीला मागील आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत 333.99 कोटी रुपयांचा तोटा झाला. कोरोना पूर्वीच्या तिकीट दराचा विचार करता 16% ते 30% प्रती तिकीट किंमती वाढल्या आहेत. नागरिक मोठ्या प्रमाणात ओटीटी आणि डिजिटल कंटेटकडे वळले आहेत. त्यामुळे भविष्यात थिएटर व्यवसायापुढे आव्हान निर्माण झाले आहे.