Rent Or Buy House: मागील वर्षभरात गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत. देशात अद्यापही महागाई नियंत्रणात नसून येत्या काळातही रिझर्व्ह बँक व्याजदर वाढवू शकते. त्यामुळे गृहकर्ज आणखी महाग होण्याची शक्यता आहे. सोबतच ज्यांनी गृहकर्ज घेतले आहे त्यांना मासिक हप्ता (EMI) जास्त भरावा लागत आहे. अशा परिस्थितीत कर्ज काढून घर विकत घ्यावे की भाड्याच्या घरातच रहावे, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
स्वत:चे घर असावे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र, प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीनुसार निर्णय घेणे योग्य राहील. कर्ज काढून घर विकत घेण्याचे आणि भाडेतत्त्वावर राहण्याचे फायदे आणि काही तोटेही आहेत. हे आपण या लेखात पाहूया.
व्याजदर वाढत असताना भाड्याच्या घरात राहण्याचे फायदे काय? (Benefit of living in rented house)
तुम्ही जर भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला दरमहा भाडे द्यावे लागेल. हे भाडे नवीन घराच्या इएमआयपेक्षा कमी असेल. समजा, तुम्ही वन बीएचके फ्लॅट भाड्याने घेतला असेल तर तुम्हाला सरासरी 12 ते 15 हजार रुपये प्रतिमहा भाडे द्यावे लागेल. मात्र, जर तुम्ही नवे घर कर्ज काढून घेत असाल तर या घराचा इएमआय जास्त द्यावा लागू शकतो.
रिलोकेशन (शिफ्टिंग) सहज करता येते
नोकरी व्यवसाय करत असताना अनेक वेळा शहर, परिसर बदलावा लागतो. कारण, नोकरीची चांगली संधी सोडू वाटत नाही. जेव्हा तुम्ही रेंटवर राहत असता तेव्हा घर बदलणे सोपे होते. मात्र, जर तुम्ही एखाद्या शहरात स्वत:चे घर घेतले तर रिलोकेशनचा निर्णय कठीण होऊन बसतो. स्वत:चे घर सोडून दुसऱ्या शहरात जाण्यास अनेकजण तयार होत नाहीत. मात्र, तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर एका महिन्यातही तुम्ही दुसऱ्या शहरात शिफ्ट होऊ शकता. आजकाल नोकरी व्यवसाय करताना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
भाड्याने राहत असताना मालमत्ता कर भरण्याची झंजट भाडेकरूला नसते. हा खर्च घरमालकाकडे असतो. मात्र, जेव्हा तुम्ही स्वत:चे घर घेता तेव्हा तुम्हाला मालमत्ता कर भरावा लागतो. मेट्रो शहरांमध्ये हा खर्च जास्त असतो. त्यामुळे इएमआय भरण्याबरोबरच तुम्हाला मालमत्ता करही भरावा लागेल.
भाडेतत्वावर राहत असताना घराचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च घरमालकाकडे असतो. हा खर्च भाडेकरूला करावा लागत नाही. मात्र, तुम्ही स्वत:चे घर घेत असाल तर देखभाल आणि दुरुस्ती खर्च करण्यास तयार राहा.
भाड्याने घर घेण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे असण्याची गरज नाही. तीन महिन्यांचे डिपॉझिट भरावे लागेल. तसेच मासिक भाडे, वीज बील भरण्यापुरते पैसे लागतील. मात्र, जर तुम्ही स्वत:चे घर घेत असाल तर तुम्हाला डाऊन पेमेंट, रजिस्ट्रेशन चार्ज आणि इतरही अनेक खर्च सुरुवातीला करावे लागतील. सोबतच EMI ही भरावा लागेल. तसेच तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहत असाल तर मालमत्तांच्या किंमतीतील चढउताराची काळजी करायची गरज नाही.
तुम्ही जर मॉर्गेज ठेवून घर विकत घेतले असेल आणि भविष्यात कर्जाचे हप्ते फेडण्यास सक्षम नसाल तर तुमची मालमत्ता कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थेकडून ताब्यात घेतली जाते. भाड्याने राहताना ही हप्त्यांची चिंता नसते. सध्या आपण पाहत आहोत की, अनेक कंपन्यांकडून नोकर कपात केली जात आहे. जर अचानक नोकरी गेली तर कर्जाचे हप्ते फेडणे अशक्य होऊ शकते. त्यामुळे तुमची भाड्याने राहत असाल तर आर्थिक जबाबदारीही कमी होते. उत्पन्नाचे मार्ग बंद होण्याची चिंताही राहत नाही.
भाड्याने राहून तुमच्याकडे जास्त पैसा खेळता राहू शकतो
जेव्हा तुम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहता तेव्हा सहाजिकच तुमचा राहण्यावरील मासिक खर्च कमी होतो. तेच तुम्ही स्वत:चे घर कर्ज काढून घेतले असेल तर खर्च जास्त असेल. भाड्याच्या घरात राहून तुम्ही उत्पन्नातील शिल्लक राहिलेली रक्कम गुंतवू शकता. भविष्य निर्वाह निधी, निवृत्तीनंतरचे नियोजन, म्युच्युअल फंड आणि इतर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता. अशा प्रकारे गुंतवणूक करून तुम्हाला चांगला परतावा मिळेल, ज्यातून तुम्ही भविष्यात मोठे आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम व्हाल.
स्वत:चे घर घेण्याचे फायदे काय आहेत? (Benefit of living in your own house)
सदनिकांच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. योग्य वेळी घरात गुंतवणूक केल्यास भविष्यात मोठी अॅसेट निर्मिती होईल. संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर घराच्या रुपाने तुमची संपत्ती निर्माण होईल. यातून तुम्हाला आर्थिक सुरक्षितताही लाभेल.
आर्थिक शिस्त
कर्ज काढून घर घेतल्यानंतर दरमहा इएमआय भरावा लागतो. यातून आर्थिक नियोजनाची शिस्त देखील लागते. बऱ्याच वेळा शिल्लक राहिलेला पैसा गुंतवणूक न करता अनावश्यक, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर खर्च केला जाण्याची शक्यताही असते.
भाडेकरू म्हणून राहण्यातील मर्यादा
भाड्याच्या घरात राहताना भाडेकरुवर अनेक वेळा घरमालकाकडून मर्यादा येतात. वाहन पार्किंग, घरामध्ये हवे असलेले बदल करण्यास मनाई, गेस्ट येण्यावर बंधने असतात. मात्र, स्वत:च्या घरामध्ये राहत असताना ही बंधने नसतात. मालक म्हणून हक्काच्या घरात राहताना तुम्ही स्वातंत्र्य अनुभवाल जे तुम्हाला भाड्याच्या घरात मिळण्याची शक्यता कमी असते.
घरामध्ये हवे ते बदल करू शकता
स्वत:च्या घरात राहताना तुम्ही घरामध्ये हवे ते बदल करू शकता. असे बदल तुम्हाला भाड्याच्या घरात राहताना शक्य होत नाहीत. बऱ्याच गोष्टींशी तुम्हाला तडजोड करावी लागते. स्वत:च्या घरात प्रायव्हसीही जास्त मिळते.
करवजावट मिळवता येते
आयकर कायद्यातील करवजावटीचा फायदा गृहकर्ज फेडताना मिळतो. व्याज आणि मालमत्ता करातून सुटका मिळते. सेक्शन 80C नुसार तुम्हाला वार्षिक दीड लाखांरुपयापर्यंत कर वजावट मिळते. सेक्शन 24 नुसार तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत करवजावट मिळू शकते. तर 80EE नुसार 50 हजार रुपयापर्यंत गृहकर्जाच्या व्याजावर वजावट मिळते. या पर्यायांद्वारे तुम्ही घर घेण्याचा खर्च कमी करू शकता. दिर्घकाळात संपत्तीही निर्माण होईल.