Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेतकऱ्यांच्या उतार वयासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेतकऱ्यांच्या उतार वयासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. परंतु असे असूनही भारतातील शेतकऱ्यांची परिस्थिती तितकीशी चांगली नाही. दरवर्षी अनेक शेतकरी आर्थिक नुकसान होत असल्यामुळे आत्महत्या करत आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना होणारे नुकसान भरून काढण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच प्रधानमंत्री किसान मानधन योजना (Pradhan Mantri Kisan Maandhan Yojana - PMKMY) ही एक आहे.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्‍यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्याला 3 हजार रूपये यानुसार दरवर्षी 36 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम पेन्शनच्या रुपात सरकार शेतकऱ्यांना देते. ही योजना केंद्र सरकारने 31 मे, 2019 रोजी सुरू केली. ही योजना देशातील सर्व लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक पेन्शन योजना आहे.

अल्पसंख्याक आणि अल्पभूधारक शेतकर्‍यांना प्रत्येक महिन्याला प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत ही पेन्शन योजना लागू होते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पेन्शचा लाभ घेऊ शकतो. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला 50 टक्के प्रीमियम भरावा लागतो तर उर्वरित 50 टक्के प्रीमियम सरकारद्वारे भरला जातो. योजना सुरू असताना लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला योजनेतून 1500 रुपये दिले जातात.

योजनेसाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे

  • अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • या योजनेंतर्गत देशातील गरीब व अल्पभूधारक शेतकरी पात्र ठरतील.
  • 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्राची शेती जमीन असावी.
  • मोबाईल नंबर
  • ओळखपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • वय प्रमाणपत्र
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • किसान मानधन योजनेअंतर्गत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://maandhan.in/ वेबसाईटवर जाऊन Click here to apply now यावर क्लिक करावे.
  • इथे तुम्हाला सेल्फ इनरॉलमेंट (Self Enrollment)वर क्लिक करायचे आहे.
  • Self Enrollment वर क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल क्रमांक टाका.
  • मोबाईल क्रमांक टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर ओटीपी नंबर येईल. 
  • ओटीपी व्हेरीफाय झाल्यावर एनरॉलमेंट (Enrollment) वर क्लिक करून प्रधानमंत्री किसान मानधन योजना यावर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, कॅप्चा कोड इत्यादी माहिती भरून फॉर्म सबमिट करा. 
  • ऑफलाईन अर्जासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जवळच्या सार्वजनिक सेवा (सीएससी) केंद्रात जाऊन सबमिट करा.

प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा प्रिमिअम

जो शेतकरी 18 ते 29 वयोगटामधील आहे, त्याला 55 रुपये ते 109 रुपयांमध्ये रक्कम जमा करावी लागते. तसेच जे शेतकरी 30 ते 39 वयोगटातील आहेत, त्यांना दर महिन्याला 110 रुपये ते 199 रुपये यादरम्यान रक्कम भरावी लागते. याशिवाय जे शेतकरी 40 वर्षांचे आहेत, जे या योजनेचा लाभ घेतात, त्यांना दर महिन्याला 200 रुपये जमा करावे लागतात. जेव्हा शेतकऱ्यांचे वय 60 वर्ष पूर्ण होते. तेव्हा सरकारकडून प्रत्येक महिन्याला 3 हजार रूपये याप्रमाणे वर्षाला 36 हजार रुपये मिळतात.

राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी राज्य विमा महामंडळ योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना यासारख्या सामाजिक सुरक्षा योजनेच्या कक्षेत येणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. पण अल्पभूधारक शेतकरी प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घेऊन त्यांचे उतारवय सुरक्षित करू शकतात.