Early Investment: बचत, गुंतवणूक करण्यास तुम्ही जेवढे लवकर सुरुवात कराल तेवढा फायदा होईल. समजा तुम्ही 25 व्या वर्षी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागले तर त्याच वर्षापासून जर गुंतवणुकीस सुरुवात केली तर पुढील 30 वर्षात मोठा फरक पडेल. मात्र, जर तुम्ही 30 व्या वर्षी तेवढीच रक्कम गुंतवण्यास सुरुवात केली तर शेवटी जी राशी जमा होईल ती निम्म्याने कमी असेल.
अगदी अल्प म्हणजे दरमहा 1 हजार रुपयांची बचतही 25-30 वर्षात मोठा फरक पाडू शकते. भविष्यात येणाऱ्या अडचणी, मोठे खर्च भागवण्यासाठी बचत आणि गुंतवणूक मदतीला येते. ऐनवेळी कोणाकडे पैसे मागण्याची, किंवा कर्ज काढण्याची वेळ येत नाही.
तारुण्यात गुंतवणूक सुरू करण्याचा फायदा?
जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 10 हजार रुपये दरमहा गुंतवणूक सुरू केली तर 12% चक्रवाढ व्याजदराने निवृत्ती वय म्हणजेच 60 व्या वर्षी एकूण रक्कम 6 कोटी 43 लाख 9 हजार 595 एवढी जमा होईल. मात्र, जर तुम्ही 30 व्या वर्षी 10 हजार रुपये रक्कम दरमहा गुंतवणूक सुरू केली तर तुमच्याकडे फक्त 3 कोटी 49 लाख 49 हजार 641 एवढी रक्कम साठेल.
फक्त पाच वर्ष उशीर केल्यास शेवटी साठणारी रक्कम निम्म्याने कमी होते. घर, गाडी, निवृत्तीनंतरचे खर्च भागवण्यासाठी SIP सारखा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, जेवढे लवकरात लवकर सुरू कराल तेवढा जास्त फायदा होईल.
साधी बचतही किती फरक पाडू शकते?
जोखीम नसलेल्या कमी परतावा असलेल्या पर्यायांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनही दीर्घकाळात मोठी राशी जमा होऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने दरमहा फक्त 1 हजार रुपये 30 वर्षांसाठी बचत केले. आणि या गुंतवणुकीवर फक्त 8% परतावा मिळाला तरी 30 वर्षांनी 12 लाख रुपये राशी जमा होईल.
गुंतवणुकीतील सातत्य महत्त्वाचे
बचत किंवा गुंतवणूक करताना सातत्य आणि शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. तरुण वयात दरमहा शिस्तीने गुंतवणूक केल्यास निवृत्तीकाळाची सोय तर होईलच. त्यासोबत मुलांचे शिक्षण, घर, गाडी, व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे, परदेशवारी, आणीबाणीसह इतरही अनेक गोष्टींची तरतूद होईल. अजूनही गुंतवणूक करण्याचा फक्त विचार मनात घोळत असेल तर ही कृती करण्याची वेळ आहे. एक-एक दिवसाची चालढकल तुम्हाला आर्थिक अडचणीत टाकेल.