अनेकांना असे वाटते की गुंतवणूक करण्यासाठी जास्त उत्पन्न असायला हवे. मात्र, हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे. तुमचे मासिक उत्पन्न फक्त 10 हजार रुपये असले तरीही योग्य पद्धतीने गुंतवणूक केल्यास भविष्यात निश्चितच फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या पगारातून दरमहिन्याला फक्त 500 ते 1000 रुपये गुंतवणुकीसाठी बाजूला ठेवल्यास काही वर्षांनी हेच पैसे लाखो रुपयांच्या ठेवीमध्ये जमा झालेले असतील. दरमहिन्याला गुंतवणूक केल्यास चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो.
विशेषकरून, महिलांसाठी दरमहिन्याला नियमित गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. सरकारद्वारे महिलांसाठी अनेक आर्थिक योजना राबविल्या जातात. या योजनेतून मिळालेल्या रक्कमेचा देखील गुंतवणुकीसाठी वापर केला जाऊ शकतो. दरमहिन्याला फक्त 1000 रुपयांची गुंतवणूक भविष्यात तुम्हाला कशाप्रकारे लखपती बनवू शकते? हे समजून घेऊयात.
दरमहिना करा 1 हजार रुपयांची गुंतवणूक
अनेकजण पगारातून शिल्लक राहिलेले पैसे बचत खात्यात अथवा भिशीमध्ये जमा करतात. यातून मिळणारे व्याज हे खूपच कमी असते. सर्वसाधारणपणे यातून तुम्ही जेवढी रक्कम जमा करतात, तेवढीच मुद्दल परत मिळते. मात्र, तुम्ही कमी जोखीम असलेल्या व जास्त परतावा देणाऱ्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) सारख्या सरकारी योजनेत पैसे गुंतवू शकता.
पीपीएफमधील ठेवींचा कालावधी हा सर्वसाधारणपणे 15 वर्ष असतो. तुम्ही दरमहिन्याला यात फक्त 1 हजार रुपये गुंतवल्यास मुदतीनंतर लाखो रुपये जमा झालेले असतील.
समजा, तुम्ही पीपीएफमध्ये 15 वर्षांसाठी 1 हजार रुपये गुंतवले. यावरील व्याजदर 7.1 टक्के आहे. 15 वर्ष तुम्ही गुंतवलेली रक्कम ही 1 लाख 8 हजार रुपये व यावर मिळालेले व्याज 1 लाख 36 हजार रुपये असेल. अशाप्रकारे, 15 वर्षानंतर तुम्हाला तब्बल 3 लाख 16 हजार रुपये रुपये मिळतील. तुम्ही जर पीपीएफचा कालावधी 15 वर्षांसाठी अजून वाढल्यास मुदतीनंतर व्याजासह तब्बल 11.99 लाख रुपये जमा झालेले असतील. फक्त दरमहिन्याला केलेली 1 हजार रुपयांची गुंतवणूक तुम्हाला लखपती बनवेल.
म्युच्युअल फंड ठरेल भविष्यातील आधार
तुम्ही दीर्घकालीन उद्देशाने म्युच्युअल फंडमध्ये देखील गुंतवणूक करू शकता. समजा, तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये 1000 हजार रुपया गुंतवणूक करत आहात. यावर 12 टक्के व्याजदर व कालावधी 30 वर्ष आहे. अशाप्रकारे, तुम्ही 30 वर्षात गुंतवलेली रक्कम ही 3.60 लाख रुपये व यावर मिळालेले व्याज हे 31,69,914 रुपये असेल. म्हणजेच, 30 वर्षानंतर तुम्हाला जवळपास 35 लाख रुपये मिळतील. मात्र, म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही काही प्रमाणात जोखीमपूर्ण असते.
चक्रवाढ व्याजाचा होईल फायदा
वरील उदाहरणावरून तुमच्या लक्षात आले असेल की कशाप्रकारे दरमहिन्याला केलेली फक्त 1 हजार रुपयांची गुंतवणूक काही वर्षांनी लाखो रुपयांमध्ये बदलू शकते. थोडक्यात, गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये उत्पन्न असण्याची गरज नाही. तुम्ही अवघ्या 100 रुपयांपासून देखील याची सुरुवात करू शकता. मात्र, ही गुंतवणूक नियमित असणे गरजेचे आहे. नियमित गुंतवणुकीमुळे चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो व तुमची जमा केलेली रक्कम वाढत जाते.