Investment: आयुष्यात प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीला निवृत्त व्हायचे आहे. त्यासाठी तुम्ही आजपासूनच नियोजन करायला हवे. निवृत्तीचे नियोजन करत असतांना अनेकदा आपले उद्दीष्ट बदलत राहतात. त्यामुळे निवृत्तीचे ध्येय गाठणे कठीण होते. तरुण काळात आपण कमाई करीत असतांना तेव्हाच्या गरजा पूर्ण करणे, हेच आव्हान तुमच्यापूढे नसून, भविष्याची योग्य तरतूद करणे हे देखील आव्हान असते.
Table of contents [Show]
प्राथमिकता कशाला
सर्वप्रथम तुम्हाला महागाईमुळे वाढत्या जीवनावश्यक खर्चासह आरोग्यसेवा, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न आणि घरात वृद्ध व्यक्ती असल्यास त्यांच्या गरजा भागवणे याबाबत विचार करावा लागेल. परंतु तुम्ही आज या सगळ्या गोष्टींवर पैसे खर्च करीत असलात तरी, भविष्यात तुम्हाला आर्थिकदृष्ट्या तुमच्या मुलांची मदत होईल की नाही? हे सांगता येत नाही.
नियोजनाचे दोन प्रमुख टप्पे
निवृत्ती नियोजनाचे दोन प्रमुख टप्पे आहेत. पहिला म्हणजे निधीमध्ये सतत वाढ आणि दुसरा निधीच्या आकारात घट. निधी उभारणीचा एक टप्पा एसआयपीद्वारे पूर्ण केला जाऊ शकतो, हा एक लोकप्रिय पर्याय आहे. चक्रवाढीच्या व्याजाचा फायदा घेण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग इक्विटीमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला जातो. SIP (Systematic Investment Plan) द्वारे नियमितपणे गुंतवलेल्या थोड्या रकमेमध्ये तुम्ही सेवानिवृत्त होईपर्यंत तुमच्यासाठी मोठा निधी तयार करण्याची क्षमता असते. परंतु निवृत्तीनंतरचा तुमचा मासिक खर्च भागवण्यासाठी तुमची गुंतवणूक कशी कमी करायची? हे मुख्य आव्हान असते. गुंतवणुकीप्रमाणेच शिस्तबद्ध पद्धतीने पैसे काढण्याचे मार्ग जाणून घेऊया.
SWP म्हणजे काय?
SWP (Systematic Withdrawal Plan) देखील SIP प्रमाणेच आहे. SIP च्या बाबतीत आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करतो, त्याचप्रमाणे SWP मध्ये आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने पैसे काढू शकतो. बहुतेक नागरिक जेव्हा निवृत्त होतात, तेव्हा जमा झालेली रक्कम खर्च करतात आणि नंतर त्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते, तेव्हा SWP किंवा सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन हा तुमच्या गुंतवणुकीतून पैसे काढण्याचा एक मार्ग आहे. सेवानिवृत्तीसाठी किंवा तुम्ही काही काळ नोकरीतून विश्रांती घेत असताना हा पर्याय उत्तम आहे. तुम्ही काम करत नसतांनाही विविध खर्चाची बिले येत राहतात, जी तुम्हाला भरावी लागतात. त्यामुळे तुम्हाला ती बिले भरण्यासाठी आणखी जे काही लागेल, त्यावर खर्च करण्यासाठी मासिक उत्पन्न किंवा मासिक आवक आवश्यक असते. यासाठी SWP हा सोयीस्कर पर्याय आहे. तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडाला महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला निर्धारीत रक्कम डेबिट करण्यासाठी एक वेळची सूचना द्यावी लागेल आणि पैसे तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातील.
आयकर सूट
जेव्हा तुम्ही SWP मधून पैसे काढता तेव्हा तुमच्या मुद्दलाचा एक भाग आणि तुमच्या नफ्याचा काही भाग तुम्हाला परत केला जातो. तुम्हाला परत केलेल्या भांडवलावर कोणताही कर लागत नाही. आणि जर तुम्ही इक्विटी किंवा हायब्रीड फंडातून पैसे काढत असाल, तर तुम्हाला मिळालेल्या नफ्यावर 10 टक्के कर भरावा लागतो. सध्याच्या कर नियमांनुसार, कमीत कमी 65 टक्के किंवा त्याहून अधिक इक्विटी असलेल्या म्युच्युअल फंडाला एक वर्षासाठी ठेवल्यास नफ्यावर 10 टक्के कर आकारला जातो. तर बँक एफडीवर तुम्हाला तुमच्या स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
चक्रवाढ व्याजाचा फायदा
पैसे काढल्यानंतर उरलेले फंड (पैसे) गुंतवलेले राहतात आणि त्यावर तुम्हाला परतावा मिळत राहतो, जेणेकरून तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळत राहील. तुमच्या कोणत्याही विशिष्ट ध्येयासाठी तुम्ही एकरकमी पैसे काढू शकता. परंतु, हे पैसे काढतांना तुम्हाला महिन्याच्या खर्चाबाबत आधी विचार करावा लागेल.
या बाबींवर विचार करा
उरलेला निधी तुम्ही तुमच्या प्रियजनांना किंवा तुमची इच्छा असल्यास कोणत्याही कारणासाठी सोडू शकता. तुमच्या अनुपस्थितीत निधी कोणाला मिळेल हे देखील तुम्ही त्यात नमूद करू शकता. अशाप्रकारे, तुम्ही तुमच्या निवृत्तीनंतरच्या वर्षांत आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असाल. म्युच्युअल फंड ही सुविधा देते. म्हणून, जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून मासिक पेआउट शोधत असाल, तर SWP हा एक चांगला पर्याय असू शकतो.