पेट्रोलियम कंपन्यांनी आज शनिवारी 7 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांत इंधन दर जैसे थेच आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव स्वस्त होत असताना भारतीयांना मात्र इंधनासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
आज शनिवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलचा भाव 94.27 रुपये इतका आहे. दिल्ली एक लिटर पेट्रोलसाठी 96.72 रुपये आणि 89.62 रुपये इतका दर आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव 92.76 रुपये इतका आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी 102.63 रुपये आणि डिझेलसाठी 94.24 रुपये इतका दर आहे.
तब्बल 232 दिवस इंधन दरात कोणताही बदल झालेला नाही. देशातील पेट्रोल आणि डिझेलचा दर हा आंतरराष्ट्रीय बाजाराशी संलग्न आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा कच्चे तेल महाग होते तेव्हा भारतात पेट्रोल आणि डिझेल, घरगुती गॅस यांच्या किंमतीत वाढ होते. मागील महिनाभरात क्रूड ऑइलच्या किंमतीत 7 ते 8 डॉलरची घसरण झाली आहे. मात्र कंपन्यांनी इंधन स्वस्त करण्याबाबत हात आखडता घेतला आहे.
यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींनी उच्चांकी स्तर गाठला होता. इंधन दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. या दर कपातीनंतर पेट्रोलचा भाव 8 रुपये प्रती लिटर आणि डिझेलचा भाव 6 रुपये प्रति लिटरने कमी झाला होता. केंद्र सरकारच्या शुल्क कपातीनंतर राजस्थान, महाराष्ट्र, ओदिशा, केरळ या राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी केला होता.