काही बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदी करणाऱ्यांची खूपच दमछाक केली आहे. त्यामुळे नवीन खरेदीदार आता रेडी टू मुव्ह प्रॉपर्टीवर (ready-to-move properties) अधिक भर देत आहेत. बिल्डर किंवा विकासकही हे समजून घेत आहेत. त्यामुळे काहींनी प्रीमियम आकारण्यास सुरुवात केली आहे. PropTiger.com च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार या वर्षी रिअल इस्टेटच्या मागणीत जोरदार रिकव्हरी झाली आहे. यासोबतच घरे बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे चालू कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीपासून घरांच्या सरासरी किमतीत सुमारे ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. PropTiger.com च्या रिअल इनसाइट अहवालानुसार, आठ शहरांमधील प्राथमिक बाजारपेठांमध्ये निवासी मालमत्तांची सरासरी किंमत जवळपास पाच टक्क्यांनी वाढली असून ती आता 6,600-6,800 रुपये प्रति चौरस फूट झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीच्या शेवटी, किंमत 6,300-6,500 रुपये प्रति चौरस फूट होती. मोठ्या शहरांबद्दल बोलायचे झाले तर, घरांच्या किमतीत (Home Rates) सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. तथापि, हैदराबाद, बेंगळुरू आणि गुरुग्राम यांसारख्या प्रमुख शहरांमधील काही भागात जास्त दरवाढ झाली आहे.
इनपुट खर्चाचा परिणाम
PropTiger.com चे ग्रुप सीएफओ विकास वाधवन म्हणतात की, घरांच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सिमेंट आणि स्टील सारख्या प्रमुख कच्च्या मालाच्या किमतीत झालेली झपाट्याने वाढ. वाढत्या इनपुट खर्चाव्यतिरिक्त, कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर मागणीतील मजबूत रिकव्हरीमुळे किमतींवर दबाव वाढला आहे. जास्त मागणीमुळे घरांच्या किमती येत्या तिमाहीत आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गेल्या मे महिन्यापासून गृहकर्जावरील व्याजदर सुमारे 2 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
महागाई असूनही रेडी-टू-मूव्ह-इन प्रॉपर्टीज अधिक लोकप्रिय
PropTiger.com च्या संशोधन प्रमुख अंकिता सूद म्हणतात की महागाई असूनही रेडी-टू-मूव्ह-इन प्रॉपर्टीज अधिक लोकप्रिय होत आहेत. त्यामुळे काही विकासकांनी त्यासाठी प्रीमियम आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे घरांच्या किमतीही वाढल्या आहेत. त्या सांगतात की सुमारे 58 टक्के संभाव्य गृहखरेदीदार रेडी-टू-मूव्ह-इन प्रॉपर्टी शोधत आहेत. विशेष म्हणजे, सध्या जेवढ्या अनसोल्ड इन्व्हेंटरी आहेत त्यात केवळ 21 टक्के (7.8 लाख घरं) रेडी-टू-मूव्ह-इन सेगमेंटमध्ये आहेत. त्यामुळे विकासक त्यावर प्रीमियम आकारत आहेत.
कोणत्या शहरात किती किमती वाढल्या?
- अहवालानुसार, अहमदाबादमधील घरांच्या किमती 5 टक्क्यांनी वाढून 3,400-3,600 रुपये प्रति चौरस फूट वरून 3,600-3,800 रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहेत.
- बंगळुरूमध्ये, निवासी मालमत्तांची किंमत 6 टक्क्यांनी वाढून 5,500-5,700 रुपये प्रति चौरस फुट वरून 5,900-6,100 रुपये झाली आहे.
- चेन्नईमधील घरांच्या किमती 5,500-5,700 रुपये प्रति चौरस फुटांवरून 2 टक्क्यांनी किरकोळ वाढून 5,400-5,600 रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहेत.
- दिल्ली-एनसीआरमध्ये किंमती 5 टक्क्यांनी वाढून 4,400-4,600 रुपये प्रति चौरस फुट वरून 4,700-4,900 रुपये झाल्या आहेत.
- हैदराबादमधील घरांच्या किमती 4 टक्क्यांनी वाढून 6,100-6,300 रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहेत, जे पूर्वी 5,900-6,100 रुपये प्रति चौरस फूट होत्या.
- कोलकात्यात घरांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढून 4,300-4,500 रुपये प्रति चौरस फूट वरून 4,400-4,600 रुपये प्रति चौरस फुट झाल्या आहेत.
- मुंबईत, किंमती 3 टक्क्यांनी वाढून 9,700-9,900 रुपये चौरस फूट वरुन 9,900-10,100 रुपये प्रति चौरस फुट झाल्या आहेत.
- पुण्यात, जुलै-सप्टेंबर 2022 मध्ये किमती 7 टक्क्यांनी वाढून 5,500-5,700 रुपये प्रति चौरस फूट झाल्या. 2021 च्या कॅलेंडर वर्षाच्या शेवटी येथील घरांच्या किंमती 5,100-5,300 रुपये प्रति चौरस फूट होत्या.