• 04 Oct, 2023 12:19

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pension Scheme : निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखाने उपभोगण्याचा आश्वासक मार्ग!

What is Pension Scheme

Pension Scheme : निवृत्तीनंतरच्या आयुष्यात सुखाने आणि आनंदाने जगता येईल अशी फिक्स रक्कम प्रत्येक महिन्याला मिळावी. यासाठी केलेल्या तरतुदीला पेन्शन म्हटले जाते.

"What do you call a person who is happy on a Monday? Retired." सोमवारीदेखील आनंदी असलेल्या माणसाला काय म्हणतात तर “सेवानिवृत्त”. पण आनंदाचा सदरा घातलेल्या त्या माणसाच्या हातातल्या काठीकडे कधी पाहिलेय का तुम्ही? त्या सुखी माणसाची काठी असते, ती त्याचे निवृत्तीवेतन अर्थात त्याची पेन्शन. धावत राहलेल्या पायांना आयुष्याची संध्याकाळ जेव्हा खुणावू लागते, तेव्हा निवृत्तीनंतरचा जीवनकाल समाधानाने आणि मुख्यतः सन्मानाने जगण्यासाठी हीच पेन्शन (Pension) हाच एकमेव आधार दिसत असतो.

निवृत्तीनंतरही दरमहिना मिळणारी रक्कम म्हणजे पेन्शन!

“काळ धावत राहतो, पण खर्च आपण स्वतः होत असतो,” असे कोणीतरी म्हटले आहे. पैसा, प्रगती, स्थैर्य, कुटुंब, जबाबदारी, कर्तव्य, आणि वयोमानाने येणारी निवृत्ती. जीवनचक्र अविरत फिरत राहतं. खर्च कमी होत नसतात. पैशांचे स्रोत मात्र मर्यादित होत जाणारे असतात. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात स्थिर रक्कम अर्थात पेन्शन (निवृत्तीवेतन) दरमहिना निश्चितपणे हाती येत रहावी याकरीता सुरु करण्यात आलेली योजना म्हणजे “कर्मचारी पेन्शन योजना” अर्थात “एम्प्लॉईज पेन्शन स्कीम” (Employee Pension Scheme).  

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना राबवते पेन्शन योजना! 

ही योजना कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO (Employees Provident Fund Organization) द्वारा चालविण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना आहे. सन् 1995 मध्ये सादर करण्यात आलेल्या या योजनेमध्ये 58व्या वर्षी निवृत्तीप्राप्त होऊ शकणारे संघटित क्षेत्रामधले जुने सदस्य तसेच नवीन EPF सदस्य कर्मचारी सहभागी होऊ शकतात. कर्मचारी आणि त्यांचे नियोक्ते (अर्थात Employers) प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या आणि महागाई भत्त्याच्या  12 % इतके योगदान देतात. कर्मचाऱ्यांनी द्यावयाचा भाग हा EPF (भविष्यनिर्वाह निधी - Provident Fund) मध्ये दिला असल्यास एम्प्लॉयर (नियोक्ता) 8.33% इतका भाग EPS म्हणजे पेन्शन स्कीममध्ये देत असतो. ह्या योजनेअंतर्गत कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर उत्पन्नाचा नियमित स्रोत म्हणून निवृत्तिवेतन दिले जाते. 

पेन्शन योजनेचा लाभ कसा मिळतो? 

कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी कर्मचाऱ्याने EPFO चे सदस्य असणे आवश्यक आहे. निवृत्तीपूर्वी 10 वर्षे सेवेची पूर्ण करणारा EPFO चा सदस्य पेन्शन योजनेचा लाभार्थी होऊ शकतो. नियमितपणे पेन्शन मिळत राहण्यासाठी कर्मचाऱ्याचे वय 58 वर्षे असणे आवश्यक आहे. मुळातच “कर्मचारी पेन्शन स्कीम” ही भारत सरकारची प्रायोजित योजना असल्याने निश्चित परताव्याची हमी असणारी, अपरिवर्तनीय गुंतवणूक योजना आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मिळू शकणारी किमान मासिक रक्कम 1 हजार रुपये आहे. वयाची 50 वर्षे पूर्ण केल्यानंतर पेन्शनची रक्कम काढता येऊ शकते. मात्र मिळणारी रक्कम ही  साहजिकच कमी व्याजदरावर आधारलेली असेल.

पेन्शन योजनांमध्ये बदल! 

सन् 2014 च्या सुधारित पेन्शन योजनेनुसार, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारने मासिक वेतनाची मर्यादा 15 हजार रुपये निश्चित केलेली होती. पण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संघटित क्षेत्रातले कर्मचारी हे पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित राहणार होते. त्यामुळे अनेक कर्मचारी संघटनांनी या निर्णयाविरोधात आणि ही सुधारित पेन्शन योजना रद्द करण्याची मागणी करीत उच्च न्यायालयांमध्ये धाव घेतली होती. मात्र अगदी अलीकडील घडामोडीनुसार सांगायचे झाले, तर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाद्वारे 2014 ची सुधारित पेन्शन योजना वैध ठरवली आहे. मात्र 15 हजार रुपयांच्या मासिक वेतनाची कमाल मर्यादा हटवित सरकारी तसेच गैरसरकारी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आहे. 

एकूणच निवृत्तीनंतरचे आयुष्य सन्मानपूर्वक आणि आनंदाने घालवण्यासाठी निवृत्तीपश्चात हाती पेन्शन असणे गरजेचे आहे. पेन्शन ही उतारवयातील आश्वासक जमापुंजी आहे. जिच्या आधारे पेन्शधारक व्यक्ती त्याचे उर्वरित आयुष्य आनंदाने आणि समाधानाने व्यतीत करु शकतो.