रुपे डेबिट कार्डाच्या (RuPay Debit card) सुलभतेमुळे ग्राहकांमध्ये त्याची लोकप्रियता आणि त्याचा वापर झपाट्यानं वाढली आहे. देशभरात तर हे डेबिट कार्ड लोकप्रिय आहेच. मात्र परदेशातदेखील आता त्याचा वापर अधिक सुलभ होणार आहे. कारण आतापर्यंत काही ठिकाणीच यामाध्यमातून पेमेंट (Payment) करणं शक्य होत होतं. आता मात्र लवकरच जगातल्या अनेक देशांतल्या ग्राहकांना रुपेच्या डेबिट कार्ड पेमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Table of contents [Show]
एनपीसीआय करणार टाय-अप
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) ही एक सरकारी कंपनी आहे. पेमेंटच्या प्रक्रियेत या संस्थेचा महत्त्वाचा वाटा आहे. आता पेमेंट प्रक्रिया आणखी मजबूत करण्याचं या संस्थेचं नियोजन आहे. त्यासाठी अनेक देशांमध्ये टाय-अप करण्याचा विचार केला जात आहे.
पेमेंट करणं सोयीचं
काही देशांमध्ये सध्या पॉइंट ऑफ सेल (POS) मशीनवर रुपे कार्ड पेमेंट करणं सोयीचं आहे. अमेरिकेचा डिस्कव्हर, जपानचा डिनर्स क्लब आणि जेसीबी तर चीनचा पल्स आणि युनियन पे या कंपन्यांच्या पीओएस मशीन्स रुपेला सपोर्ट करतात. म्हणूनच या मशीन्सद्वारे पेमेंट करणे अधिक सुलभ आहे. मात्र जगातल्या इतर देशांत असलेल्या ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येत नाही.
व्हिसा आणि मास्टरकार्डचा स्पर्धक?
ईटीनं यासंदर्भातलं वृत्त दिलंय. त्यांच्या रिपोर्टनुसार, पेमेंटच्या या संपूर्ण प्रक्रियेत जागतिक स्तरावर सध्या व्हिसा आणि मास्टरकार्डचं वर्चस्व आहे. रुपे डेबिट कार्डालादेखील जागतिक स्तरावर व्हिसा आणि मास्टरकार्डचा स्पर्धक बनवण्यासाठी एनपीसीआय प्रयत्न करत असून रुपेला अधिक मजबूत बनविण्याच्या कामात ती गुंतली आहे. मास्टर आणि व्हिसा कंपनीचे कार्ड यूझर्स रुपे कार्डवर येतील, अशी व्यवस्था करण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू झालाय.
एनपीसीआयनं पहिल्यांदाच मार्च 2012मध्ये
एनपीसीआयनं पहिल्यांदाच मार्च 2012मध्ये डिस्कव्हर फायनान्शियल सर्व्हिसेसशी करार केला. त्यामुळे भारतीय ग्राहकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपे कार्डद्वारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध झाली. यानंतर रुपेनं सातत्यानं आपलं नेटवर्क वाढवण्याचं काम केलंय. 2019मध्ये जेसीबी ग्लोबल इंडिया आणि जेसीबी कार्ड यांच्या संयुक्त विद्यमानं त्यांनी आपलं नेटवर्क वाढवलं. आता विविध कंपन्यांशी टाय-अप करून हेच नेटवर्क अधिक वाढवण्याचं आणि मजबूत करण्याचं काम एनपीसीआय करणार आहे.
रुपे आहे तरी काय?
मागच्या काही वर्षांपासून नावारुपाला आलेली पेमेंटची ही सुविधा आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रुपे डेबिट कार्डाला यूपीआय पेमेंट सिस्टमशी जोडण्यास अलिकडेच परवानगी दिली. एनपीसीआयनं याला यूपीआयशी जोडून ग्राहकांना अधिक सुलभता देण्याचा प्रयत्न केला. जगभरातल्या काही देशांमध्ये दुकानं, हॉटेल तसंच इतर महत्त्वाच्या ठिकाणी भारतातल्या याच्या यूझर्सना अडचणी येवू नयेत, अशी व्यवस्था करण्यात आली. ऑनलाइनच्या माध्यमातून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य झाल्या आहेत. रुपया आणि पेमेंट यांच्या एकत्रीकरणातून रुपे नाव उदयाला आलं. आता तर ते एक ब्रँडनेमच झालंय. याच्या विस्ताराचा एक भाग म्हणून प्रधानमंत्री जनझन योजनेच्या खातेधारकांना रुपे कार्डाचं वाटप करण्यात आलं. त्यामुळे अनेकांपर्यंत ते पोहोचलं.